लिखाणाच्या पद्धती आणि मध्ययुगीन महजर

राजवाडे खंड ६ (जुना) मधील सरदार पुरंदऱ्यांच्या यादीतील ही एक नोंद. चांबळी गावच्या हक्कविषयीचा महजर करण्यात आला तेव्हा त्यावर शिक्के करण्यावरून वाद झाला. हा वाद काहीही असो, पण या नोंदीवरून आपल्याला शिक्के कोणी, कधी, कुठे, कसे करायचे यासंबंधी थोडीफार माहिती मिळते ती अशी-


-------------------------------------------------

अधिक वद्य १० गुरुवारीं चांबळीचा महाजर, निम्मे पाटीलकीचा, सडेकरास करून दिल्हा. त्याजवरी शिक्के जाले. ऐशियास, पहिलेच, महजर लिहिला होता. त्याजवरी देशमुखाचा शिक्का होणें होता. तो देशमुखानीं करून मागेंच दिल्हा. जोडावर देखील शिक्के केले होते. राजमुद्रा पाहिजे. सरदेशमुखाचेंहि चिन्ह पाहिजे. त्यास सदो बयाजी याणीं दिकत घेतली कीं, सरदेशमुखाचें जालें नसतां, देशमुखानीं कां शिक्का केला ? हे दिकत घातली. राजमुद्रा हवालदाराची करावी. कर्हेपठारीं हवालदार नाहीं. हुजूरच श्रीपतराऊ बापूजी वोढितात. तेव्हां हवेली सांडसचे हवालदार तान्हाजी सोमनाथ याचा शिक्का करवूं लागले. त्याणीं दिकत घेतली कीं, जमीदारांनी आधीं शिक्के कां केले ? दुसरे जोडावर शिक्के कां केले ? याजमुळें दिकत घेतली. हकीमानीं दिकत घेतली, सरदेशमुखी ही हकीमाची. उपाय काय ? तेव्हां पाहिला महजर फिरविला. दुसरा केला. त्याजवरी एके बाजूनें काजीचें नांव घालून शिक्का केला. दुसरे बाजूस बाबाजीनें तान्हाजी सोमनाथ हवालदार व बापूजी रघुनाथ मजुमदार ता। हवेली सांडस ऐसें नांव लिहिलें. त्याजखालीं हवालदारांनी शिक्का केला. मोर्तब जोडावर केली. त्याजवर सदोबानीं सरदेशमुखीचे गुमास्ते सरदेशमुख प्रा। मारीं ह्मणून काजी खालीं एका बाजूस लिहिलें. त्याचे शेजारी शिदोजी नरसिंगराऊ व गोविंदराऊ शिताळे देशमुख प्रा। मार ह्मणून बहिरो कृष्ण धडफळे याणीं नांवें लेहून खाली वडिलेकडील शिक्का केला. पहिल्या कागदावरील देशमुखाचे शिक्के उतरले. सरदेशमुखाचें दस्तक नवेंच पाठी लाविलें. राज्याची सरदेशमुखी. उपाय नाहीं ! एक वेळ एके बाजूस सरदेशमुखाचे लिहीत. त्याखालीं एके बाजूस देशमुख. देशमुखाचे शेजारी, होनप देशपांडे ऐसें लिहित. एक वेळ देशमूख देशपांडियावर बीत सरदेशमूख ऐसेंहि लिहिले आहे. आजि तिन्ही शेजारीं लिहिलीं. शामराऊ व नारो आप्पाजी याणीं लेहविलीं. पहिलियाने सरदेशमुख, मध्ये देशमूख, शेवटी देशपांडे, ऐसें लिहिली आहेत. सरदेशमुख हकीम व हकीम ते हकीमच ! जे वेळेस जैसें लिहितील तैसें लिहिलें असे.

-------------------------------------------------


१) महजरावर राजमुद्रा आणि सरदेशमुखांचे चिन्ह हवे होते, ते इथे नव्हते. राजमुद्रा म्हणजे प्रत्यक्ष राजाची मुद्रा असा याचा अर्थ नसून इथे ज्याच्या भरतो त्याची मुद्रा म्हणजे राजमुद्रा. इथे कर्हेपठारचा हवालदार म्हणजे मुख्य समजला आहे. 

२) सरदेशमुखीचा शिक्का झालेला नसतानाही देशमुखने शिक्का केला ही गोष्ट वादींनी लक्षात आणून दिली आहे. म्हणजे प्रथम सरदेशमुखाने शिक्का करायचा आणि त्यानंतरच देशमुखांचा शिक्का व्हायला हवा होता. देशमुखांसोबतच इतर जमीनदारांनीही सरदेशमुखांच्या आधी शिक्के केले हे चुकीचे होते. 

३) महजर हा प्रचंड मोठा असू शकतो, जितकी कैफियत मोठी तितका महजर मोठा. म्हणून अनेक कागदांचे बंद लिहून ते एकमेकांना चिकटवले जात. या प्रत्येक जोडलेल्या कागदांच्या जोडावर भविष्यात स्वार्थासाठी कोणी कागदाची अदलाबदल करू नये म्हणून विशिष्ट खूण उमटवली जात असे. आपल्याकडे मध्ययुगीन कागदपत्रांवर मोर्तब अथवा समाप्तिमुद्रा उमटवण्याचा प्रघात होता. पण इथे या महजरावर मोर्तबा न उमटवता शिक्के उमटवले गेले जे चूक होतं. यावरही हरकत घेतली गेली. 

४) पूर्वी सरदेशमुखाचे नाव वर आणि त्या खाली एका ओळीत देशमुख देशपांडे यांचे लिहिले जाई. काही ठिकाणी सरदेशमुखांचा शिक्का न वापरता 'बीत सरदेशमुख' असंही लिहिलं आहे, पण या महजरात मात्र एका रेषेतच सरदेशमुख, देशमुख, आणि देशपांडे यांची नावं लिहिली. अर्थात, हे प्रघात नंतर बदलले गेले असं दिसतं. 

५) अखेरीस नवीन महजर करून जोडावर शिक्क्याऐवजी मोर्तब करून त्या त्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि नव्याने महजर फिरवण्यात आला. स्रोत: मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ६, पृष्ठ ७९

- कौस्तुभ कस्तुरे । survarnapaane@gmail.com

#इतिहासाच्या_पाऊलखुणा