रियासतकार सरदेसाईंचं ताजमहालविषयी विवेचन

ताजमहाल म्हणजेच तेजोमहाल असं काहीसं असलेलं पु. ना. ओकांचं पुस्तक अनेकदा चर्चेत असतं. मी स्वतः ते पुस्तक वाचलेलं नाही, मुद्दामहून नाही असं नाही, किंबहुना आजवर ते वाचनात आलं नाही. या पुस्तकावरून उघड उघड दोन गट पडलेले मी अनेकदा पाहतो आहे. असो, मला त्यांच्या या विषयात जायचं नाही. पण ताजमहालविषयी जुन्या जाणत्या इतिहासकारांपैकी एक, थोडक्यात सांगायचं संबंध मध्ययुगीन इतिहासातील 'रियासती' लिहिण्यावर ज्यांनी सुमारे दहा हजारांहून जास्त पाने खर्ची घालवली असे इतिहास संशोधक गोविंद सखाराम सरदेसाई 'मुसलमानी रियासती'च्या दुसऱ्या भागात ताजमहालविषयी काय माहिती देतात ती पाहू. ही हकीकत त्यांना पातशहानाम्यात आढळली असं रियासतकार लिहितात -

"मुमताजमहाल इला कळून चुकले की आता आपण जगत नाही, तेव्हा तिने जहानआरास पाठवून बादशहास आपणाकडे बोलाविले. तो लगेच मोठ्या काळजीने धावत आला. तिने मुलांचा सांभाळ करण्याविषयी बादशहास विनंती केली आणि आपण परलोकवास पत्करला. नंतर बऱ्हाणपूरच्या समोर तापीनदीच्या काठी एका बागेत प्रथम तिचे दफन झाले. पण पुढील डिसेंबर तारीख १ रोजी तिचे शव आग्ऱ्यास नेण्यास आले. बरोबर शाहजादा शुजा होता. ता. २९ डिसेंबर रोजी मातुःश्रींचे प्रेत घेऊन तो आग्र्यास पोहोचला.

आग्र्याच्या दक्षिणेस एक जागा पाहून ती मानसिंगाचा नातू राजा जयसिंग याच्याकडून बादशहाने खरेदी केली आणि इमारतीच्या कामात निष्णात असलेल्या अनेक लोकांकडून एका सुंदर इमारतीचे नकाशे मागवले. त्यापैकी एक बादशहाने पसंत केला आणि प्रथम त्याचा लाकडी नमुना करविला. नमुन्याप्रमाणे सन १६३१ च्या आरंभी इमारतीची सुरुवात झाली. ती सन १६४३ च्या जानेवारीत पुरी झाली. मकामतखान व अब्दुलकरीम हे दोघे त्या कामावर मुख्य देखरेख करीत होते. त्या इमारतीस पन्नास लाख रुपये खर्च झाला.पुन्हा सांगतो, मी ओकांचं पुस्तक वाचलेलं नाही, पण ज्या अर्थी मिरझाराजा जयसिंगाकडून शहाजहानने ही 'जागा' विकत घेतली त्या अर्थी त्या जागेवर सामान्य बांधकाम असले पाहिजे अथवा काहीच नसले पाहिजे. तिथलं देऊळ तोडून मानसिंगाच्या वंशजांना, कछवाह राजपुतांना, ज्यांनी खुद्द मुघलांशी शरीरसंबंध केले होते, अशांच्या दैवताला हात घालण्याइतपत बादशाह नक्कीच मूर्ख नव्हता. पन्नास लाखांचा आलेला खर्च हा बादशहाला कठीण नसल्याने रियासतकार स्पष्ट म्हणतात की मजदुरांकडून फुकटात काम करून हात तोडण्यात आले इत्यादी दंतकथाच दिसतात. शिवाय, आणखी एक प्रवाद मध्यंतरी वाचनात आला होता की ताजमहाल पूर्वीच्या इमारती या लाल दगडात असताना केवळ ताजमहाल संगमरवरी कसा? याचं उत्तर म्हणजे जिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला ती अर्जुमंदबानू बेगम उर्फ मुमताजमहल ही अकबराच्या एका पर्शियन सरदाराची मुलगी. मुमताजची आत्या म्हणजे जहांगीरची प्रसिद्ध विसावी बायको- नूरजहाँ. तिच्याच करवी जहांगीर-नूरजहाँने शहाजहानचं लग्न मुमताजशी लागलं. आणि म्हणूनच, या 'इराणी' घराण्याचा आणि पर्शिअन वास्तुकलेचा ताजमहालात संगम आहे. जेव्हा नूरजहाँ मुघल घराण्यात आली तेव्हापासून म्हणजेच जहांगीरच्या काळापासूनच इराणी वास्तुकलेचा प्रवेश झाला. रियासतकारांनी मनमोहन चक्रवर्ती नावाच्या कोण्या संशोधकाच्या 'इंडियन वर्ल्ड' मासिकाच्या ऑक्टोबर १९०५ मधील अंकाचा याला संदर्भ दिला आहे. या व्यक्तीने अकबरापासून शाहजहानपर्यंत वास्तुकलेत कसे बदल झाले ते साधार स्पष्ट केलं आहे. असो, थोडक्यात रियासतकारांचं ताजमहालविषयी हे विवेचन.