समर्थ रामदासांचा हनुमंत

जांबेच्या ठोसरांच्या घराण्यात सूर्योपासनेसोबतच रामउपासनाही पूर्वापार चालत आलेली होती. पुढे सूर्याजिपंतांच्या धाकट्या मुलाचा, नारायणाचा रामदास झाला आणि रामोपासनेला आणखी झळाळी मिळाली. पण ‘रामदास’ हे नाव धारण केल्यानंतर समर्थांनी आणखी एका दैवतालाही शिरोधार्ह मानले, आणि ते म्हणजे श्री हनुमंत. मारुतीची उपासना महाराष्ट्रात अनंत काळापासून सुरु आहे असं म्हटलं जातं. अर्थात, संबंध भारताला मारुती कोण हे वेगळं सांगण्याची गरज नक्कीच नाही, किमान पौराणिक काळापासून म्हणजे आजपासून सुमारे दोन हजार वर्षांपासून तरी श्रीरामचंद्रांसोबत मारुतीचं नाव सगळ्यांनाच माहीत आहे. पण महाराष्ट्रात मारुतीचं केवळ आशीर्वाद देणारी देवता असं चित्रण बदलून एक पराक्रमी, शत्रूला प्रसंगी मारणारा बलदंड शरीराचा एक भीमरूपी योद्धा अशी ओळख करून देणारी व्यक्ती म्हणजे समर्थ! आज आपल्याला गावोगाव ज्या तालमी दिसतात, त्या तालमींमध्ये मारुतीची मूर्ती आणि प्रार्थना सुरु करण्याचं श्रेयही समर्थांना द्यावं लागेल. मारुतीराय म्हणजे सुद्धा रामाचे दासच. श्रेष्ठ रामदास! आणि म्हणूनच रामदासस्वामी मारुतीला गुरुबंधू म्हणतात, पण गुरुबंधू म्हणतानाही, आपल्या कुळातीलच आहे असं म्हणतानाही त्यांनाही आपलं दैवत मानतात. समर्थ म्हणतात, “आमुचे कुळी हनुमंत । हनुमंत आमुचे दैवत । तयावीण आमुचा परमार्थ । सिद्धितें न पावे कीं ।।”. 

स्वामी माझा ब्रम्हचारी । मातेसमान अवघ्या नारी ॥
उपजतां बाळपणीं । गिळूं पाहे वासरमणि ॥
आंगीं शेंदुराची उटी । स्वयंभ सोन्याची कांसोटी ॥
कानीं कुंडलें झळकती । मुक्तमाला विराजती ॥
स्वामीकृपेची साउली । रामदासाची माउली ॥ 

हा मारुती म्हणजे स्वामीकृपेची, श्री रामचंद्रांच्या कृपेची जणू काही सावलीच आहे, आणि म्हणून तो मला माउलीसमान आहे. हनुमंताचं चरित्र अतिशय थोडक्यात सांगताना समर्थांनी त्याच्या बाललीला वर्णन केल्या आहेत. पण या पद्याच्या शेवटी असलेला चरण अतिशय महत्वाचा आहे- 

नवल अवचित देखीलें । फळ म्हणुनी झेंपावलें । मंडळ सूर्याचें गिळिलें । बाळपणीं ॥
सेना उदंड मारिली । लंका जाळुनि होळी केली । शुद्धि सीतेची आणिली । ख्याति जाली ॥
धन्य मारुति निधान । लक्ष्मणा जीवदान । सकळिकांचें समाधान । हें महिमान ॥
कटीं सोन्याची कांसोटी । घंटा घागरियांची दाटी । घेतो उड्डाण जगजेठी । चारी कोटी ॥
द्रोणगिरी उत्पाटिला । लागवेगें झेंपावला । प्राण सकळांचा राखिला । धन्य जाला ॥
गिरीवरें गर्व केला । पर्वत मैनाक वाढला । शून्य मंडळ भेदुनि गेला । तो मारुति ॥
रघुनाथाला सोडविलें । पाताळदेवतें मारिलें । सिंधुर सर्वांगीं चर्चिले । तैंपासोनी ॥
हा तों ईश्वरी अवतार । भीम सकळांसी आधार । रामध्यानीं निरंतर । भक्तराज ॥
मुहुर्त रावणें पाहिलें । रघुनाथाला पाचारिलें । अरिष्ट स्वामीचें घेतलें । आपणांवरी ॥
राम गेले वैकुंठासी । तैं निरविलें हनुमंतासी । तुवां माझिया भक्तांसी । सांभाळावें ॥
रामदासाचा सारथी । विघ्नें चळचळां कांपती । पावे संकटीं मारुति । भरंवशानें ॥

या रामदासाचा सारथी जणू काही हा मारुतीच आहे, माझं जीवन करू काही हाच पुढे नेत आहे. याच्या समोर सारी विघ्नं चळाचळा कापतात. कोणतंही संकट असो, मनात केवळ भरवसा असू द्यावा, हा मारुतीराया नक्कीच पावतो. 

समर्थ रामदासस्वामींनी मारुतीवर केवळ ‘भीमरूपी महारुद्रा’ हे एकाच स्तोत्र रचलं असा आपला समज असतो, पण समर्थांची मारुतीवर अनेक स्तोत्रे आहेत. त्यातील ११ स्तोत्रे ही समर्थस्थापित अकरा मारुतींशी निगडित आहेत. भीमरूपी स्तोत्र हे अनुष्टुप छंदातील प्रथम स्तोत्र असल्याने ते सार्वत्रिक प्रसिद्ध झालं आहे. हे स्तोत्रंही आपण केवळ एरवी वाचतो, अथवा म्हणतो, पण या स्तोत्राचा शब्दशः अर्थ आपण कधी लक्षात घेतला आहे का? स्तोत्र सगळ्यांनाच माहित असल्याने ते जसंच्या तसं न घेता आपण त्याचा अर्थ पाहू- 

“भीमरूपी, प्रचंड अशा महारुद्रा, तू जणू वज्रासारखा कठीण आहेस. वनात वास्तव्य करणाऱ्या अंजनीचा हा पुत्र, प्रभंजन, रामदूत आहे. अत्यंत महाबळी शक्तिशाली असलेला हा प्राणदाता आपल्या शक्तीने जणू काही सगळ्यांना जागृत करतो. हा अत्यंत सौख्यकारक आहे, सगळ्यांचं दुःख हरण करतो. तो अत्यंत धूर्त असा वैष्णव आहे. वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त. राम हा विष्णूचा अवतार असल्याने समर्थांनी इथे हनुमंतालाही वैष्णव म्हटलं आहे. धूर्त या शब्दाचा अर्थ आहे चाणाक्ष. हा मारुती दीनानाथ आहे, तो जणू काही शंकराचं रूप आहे, आणि म्हणुनच अत्यंत सुंदर असा असला तरी कपाळावर भव्य असं सिंदुरलेपन करून पाताळातल्या देवतांनाही तो भयकंपित करतो. हा लोकनाथ आहे, जगन्नाथ आहे, खूप पूर्वीपासून प्राणनाथ (म्हणजे प्राणांचं रक्षण करणारा) आहे. तो स्वतः पुण्यवंत आणि पुण्यशील असा पावनपवित्र आहे”. यानंतर मग हनुमंताचं पुढचं चित्रण करताना समर्थ म्हणतात, “उंच ध्वजासारखे बाहू उचलून अत्यंत आवेशाने मारुती पुढे लोटला की काळ आणि रुद्रदेवता इत्यादी सुद्धा भयकंपित होतात. त्याचं मुख विशाल आहे आणि त्याच्या दंतपंक्ती आवळल्या गेल्या की जणू त्यात ब्रह्माण्डच्या ब्रह्माण्ड सामावली आहेत असा जणू काही भास होतो. त्याच्या भुवया अत्यंत ताठ झाल्या असून नेत्रांवाटे जणू आगीचे लोळ पसरत आहेत. त्याचं पुच्छ म्हणजे शेपटी माथ्यावर वळवून घेतलं असून तिच्या अग्रभागी कुंडलं शोभत आहेत. कमरेला सुवर्णकटी आणि किणकिणणाऱ्या घंटा बांधल्या आहेत. हा मारुती अत्यंत सडपातळ वाटत असला तरी उभा ठाकला की जणू एका पर्वतासारखा वाटतो. त्याचं अंग इतकं चपळ आहे की वीजेच्या वेगालाही तो लाजवेल. कोटीकोटी उड्डाणे घेऊन हा उत्तरेकडे झेपावला आणि मंदार पर्वासारखा प्रचंड द्रोणागिरी त्याने केवळ क्रोधाने उपटून काढला. तो घेऊन मारुती दक्षिणेत आला, आणि काम झाल्यावर पुन्हा माघारी उत्तरेत घेऊनही गेला, आणि हे कसं तर केवळ मनाच्या गतीने. म्हणजे आपण विचारही करू शकणार नाही इतक्या कमी वेळात. याच्या गतीची तुळणा तरी कशाशी करावी? याने मनाच्या गतीलाही मागे टाकलं. हा लहानात लहान अणुइतका लहान होतो आणि ब्रह्माण्डाइतका मोठा होऊ शकतो, मग त्याला तुलना तरी कसली? अगदी मेरू-मंदार पर्वत सुद्धा त्याच्यापुढे खुजे ठरतात. स्वतःच्या वज्रपुच्छाने तो जणू ब्रह्माण्डालाच वेढा घालू शकतो, मग या अखिल ब्रह्माण्डात त्याला तुलना तरी कसली? त्याचे आरक्त झालेले डोळे पाहिले की जणू सूर्यमंडळालाही ते ग्रासून टाकतात, आणि मग तो मोठा व्हायला लागला की जणू काही हे शून्यमंडळ, हे अखिल विश्वही तो भेदून जातो. अशा या मारुतीच्या स्तोत्राच्या पठणाने तुमच्या साऱ्या चिंता दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. हे पंधरा श्लोक म्हणजे जणू चंद्राच्या पंधरा कला आहेत, ज्या हळूहळू वाढत जाऊन पूर्ण प्रकाशमान होतात. हा मारुती म्हणजे सगळ्या रामदासांच्या अग्रस्थानी आहे, कपिकुळास भूषण असा आहे, याच्या दर्शनाने सगळे दोष नासतात”. असा हा समर्थांचा मारुती म्हणजे शक्तीचं मूर्तिमंत उदाहरण होता. या जगात तुमचा निभाव कधी लागू शकतो? तुम्ही केवळ ताकदवान असून उपयोग नाही, तुम्हाला बुद्धीही हवी. तुम्ही केवळ बुद्धिवान असून उपयोग नाही, ताकदीशिवाय बुद्धी व्यर्थ आहे. आणि म्हणूनच, तुमच्याकडे शक्ती आणि बुद्धी या दोन्हीची जोड असेल तर जगातील उत्तमोत्तम माणसेही तुमचं कोडकौतुक गातात. हीच समर्थांची शिकवण होती. त्यांचं ‘अध्यात्मासार’ हे केवळ ५७ चरणांचं स्फुट काव्य हे जणू काही रामचंद्रांच्या माध्यमातून शक्ती आणि बुद्धी या दोन्हीचं महत्व सांगणारं असं उत्तम काव्य आहे. या काव्याच्या सुरुवातीला रामचंद्रांनी लंकेच्या दिशेला जाताना बंधू लक्ष्मणासह प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या पारच्या तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि मग भवानीने रामाला वर दिला (म्हणून ती पुढे रामवरदायिनी ओळखली जाऊ लागली) इत्यादी वर्णन केलं आहे. पुढे २६ ते ३२ श्लोकांपर्यंत समर्थ जे काही म्हणतात ते असं-

शक्तीने पावती सुखे । शक्ती नसता विटंबना ।
शक्तीने नेटका प्राणी । वैभवे भोगिता दिसे ।।२६।।
कोण पुसे अशक्ताला । रोगिसे बराडी दिसे ।
कळा नाही कांती नाही । युक्ती बुधी दुरावली ।।२७।।
साजिरी शक्ती तो काया । काया मायाची वाढवी ।
शक्ती तो सर्वही सुखे । शक्ती आनंद भोगवी ।।२८।।
सार संसार शक्तीने । शक्तीने शक्ती भोगिजे ।
शक्त तो सर्वही भोगी । शक्तीवीण दरिद्रता ।।२९।।
शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होतसे ।
शक्ती युक्ती जये ठाई । तेथे श्रीमंत धावती ।।३०।।
युक्ती ते जाड कळा । विशक्तीसी तुळणा नसे ।
अचूक चुकेना कोठे । त्याची राज्ये समस्तही ।।३१।।
युक्तीने चालती सेना । युक्तीने युक्ती वाढवी ।
संकटी आपणा रक्षी । रक्षी सेना परोपरी ।।३२।।

या सगळ्याचा काव्यातून असलेला संबंध जसा रामचंद्रांशी आहे तसा तत्कालीन जनतेशी आणि धुरीणांशीही आहे. यातून समर्थ एकाच संदेश देत आहेत, की शक्ती आणि बुद्धी दोन्ही कमवा. जर तुमच्याकडे शक्ती असेल तर जवळपास सगळी सुखं तुमच्यापाशी एकवटतील, पण ती जर का नसेल तर मात्र विटंबनेशिवाय दुसरं काही पदरी पडणार नाही. शक्ती असेल तर तुम्ही निरनिराळी वैभवे भोगाल, नाहीतर अशक्ताला या जगात कोण विचारतं? कायम काहीतरी आजार झाल्यासारखी, बुद्धी गहाण टाकल्यासारखी अशक्त व्यक्ती ही मरगळलेली असते. तुमचं शरीर हे अतिशय महत्वाचं आहे, आणि शक्ती हेच शरीरधन आहे. शक्तीने नेटका असलेला प्राणी वैभव भोगतो, बाकी मात्र शरीराच्या दृष्टीने दरिद्रीच राहतात. पुढे मग समर्थांनी राज्याचा कारभार उत्तम कसा चालेल, त्यासाठी काय करावं लागेल इत्यादी वर्णन केलं आहे. 

थोडक्यात काय तर शारीरिक शक्तीचं महत्व हे तरुणांना समजावं हा समर्थांचा उद्देश होता आणि त्याकरताच समर्थांची धडपड सुरु होती. देशभरात समर्थांच्या आयुष्यातच ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं आणि मठ उभारले जात होते त्यामागे काय वेगळं कारण होतं? केवळ रामचंद्रांचा सहाय्यक मारुती नव्हे तर शरीरबलाने शत्रूला सळो की पळो करून सोडणारा हनुमंत समर्थांनी लोकांसमोर ठेवला. 

समर्थांचा मारुती कसा आहे? त्यांनी स्थापन केलेल्या मूर्तींमध्ये आपल्याला बहुतांशी आढळणाऱ्या मूर्ती या एकाच प्रकारच्या असतात. अत्यंत वेगाने उड्डाण करणारा मारुती आपला डावा हात कमरेवर ठेऊन उजवा हात कानाजवळून उंचावलेला असल्याचं आपल्याला दिसतं. या हाताची पाचही बोटं नीट पाहिली असता एकमेकांपासून विलग असल्याचं दिसून येईल. प्रथमदर्शनी बघता मारुती आशीर्वाद देत आहे असं वाटू शकेल, पण नीट पाहिल्यास ते तसं नाही हे लक्षात येतं. आशीर्वादासाठी कधीही हात डोक्याच्या वर नेला जात नाही, शिवाय आशीर्वाद देताना हाताची सर्व बोटं एकमेकांना चिकटलेली असतात. त्यामुळे हा हात आशीर्वादाचा नसून तो शत्रूला मारण्यासाठी उगारलेला आहे. जणू काही उड्डाणाच्या पवित्र्यात असून समोरच्याला मारण्यासाठी आवेशात वर गेला आहे. आपल्याकडे म्हटलं जातं की ‘जिथे गाव तिथे मारुती’. ही प्रथा कोणी सुरु केली असेल बरं? मला तरी वाटतं याचे जनक रामदासस्वामीच असावेत. कारण या गावागावातल्या मारुतीच्या मुर्त्या जवळपास सारख्याच रचनेच्या आढळतात आणि ती संरचना रामदासस्वामींनी दर्शवलेली आहे. प्रत्येक गावात मारुतीची मूर्ती उभारण्यामागे हेतू हाच की त्याच्यासारखी निडरता, बुद्धी, शौर्य, चपळता, शारीरिक ताकद, नम्रता-साधेपणा पण तितकीच कर्तव्यदक्षता ही लोकांमध्ये बाणली जावी. मारुतीच्या उपासनेने या सगळ्या गोष्टी आत्मसात करता येतील असा समर्थांचा आशय होता. यावरून आणखी एक गोष्ट आठवली ती म्हणजे महाराष्ट्रात चालत आलेली कुस्तीची परंपरा आणि त्यातील मारुतीचं महत्व. कोणत्याही कुस्तीच्या तालमीत आपण मारुतीची मूर्ती अथवा किमान एकतरी छायाचित्र पाहतोच. याचाही संबंध रामदासस्वामींशीच असेल का? अर्थात, नक्कीच. 

मारुतीरायांना आपले गुरुबंधू म्हणून मानणारे समर्थ हेसुद्धा काळानुरूप मारुतीचेच अवतार मानले जाऊ लागले, हा श्रद्धेचा विषय जरी सोडला, तरी समर्थांनी आपल्या नसानसांत मारुती सामावून घेतला होता ही गोष्ट त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि शिकवणीतून ठायी ठायी दिसून येते. बहुत काय लिहिणे? राजते लेखनावधी.
© कौस्तुभ कस्तुरे

छायाचित्रे साभार: समर्थसृष्टी, सज्जनगड (श्री. संजय दाबके, श्री. पुष्कराज महाजन)सदर लेख वर्ष २०१९ च्या सज्जनगडावरून प्रकाशित होणाऱ्या ‘रघुवीर समर्थ’ मासिकाच्या ‘दासनवमी विशेषांका’साठी लिहिण्यात आला असून इतर कुठेही परवानगीशिवाय प्रकाशित करता येणार नाही याची नोंद घ्यावी.