माझ्या पहिल्यावहिल्या कादंबरीविषयी..

ऐतिहासिक कादंबऱ्या म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणी, खरंतर लहानपणी कशाला, अगदी दहावी-बारावीच्या परीक्षा होईपर्यंत मी महिन्याच्या सुट्टीत एकाच विरंगुळा असायचा तो म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या वाचणं. रणजित देसाईंची श्रीमानयोगी आणि शिवाजी सावंतांची छावा याची तर पारायणं झालेली. म्हणजे हजार-हजार पानांच्या या कादंबऱ्यांचा पुढे पुढे तर मी जेमतेम चार-पाच दिवसात फडशा पडत असे.
तसं बघायला गेलं तर घरात ऐतिहासिक कादंबऱ्यांची कमतरता मुळीच नव्हती. राऊ, शिकस्त, झेप, झुंज, मृत्युंजय वगैरे सगळं घरात होतंच. शिवाय या वाचून झाल्या की मग ग्रंथसखा मधून युगंधर, राजेश्री, शहेनशहा, मंत्रावेगळा वगैरे कादंबऱ्या आणून वाचायचो. त्या पलीकडे जाऊन वि. वा. हडपांच्या पेशवाईवरील आणि कॅप्टन वासुदेव बेलवलकरांच्या 'कळस चढविला मंदिरी' सारख्या कादंबऱ्यांनी वेड लावलं. यातील प्रत्येक लेखकाची अशी विशिष्ट शैली आहे. मला वैयक्तिकरित्या कायमच भावले, आवडले ते म्हणजे ना. सं. इनामदार !
इनामदारांच्या कादंबऱ्या म्हणजे ऐतिहासिक भाषा, उत्तमोत्तम असं प्रसंगचित्रां आणि आणि मुख्यत्वेकरून 'इतिहासाची कास न सोडता' कादंबरी लिहिण्याची पद्धत. अर्थात, ती कादंबरी असल्याने त्यात लेखकाचं लेखनस्वातंत्र्य हे असणारच हे उघड आहे. एक गोष्ट मागे बाबासाहेबांनी सांगितलेली आठवत्ये. बाबासाहेब आणि इनामदारांच्या एका भेटीत त्यांनी एका कादंबरीविषयी गप्पा मारताना त्यांनी इनामदारांना म्हटलं होतं, "तुम्ही सगळं अक्षरशः जिवंत केलं, जणू काही त्या व्यक्तीच समोर आहेत, आपण त्या काळात आहोत. पण एक गोष्ट नजरेतून सुटली तुमच्या". इनामदारांनी अगदी उत्सुकतेने विचारलं तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "तुम्ही एके ठिकाणी समईच्या आठही वाती तेवत होत्या असं म्हटलं आहे, पण कोणत्याही समईला विषय संख्येत वाती लावू शकतो, सात किंवा नऊ, तेव्हा तो एक आठचा मुद्दा अनैतिहासिक आहे हे मी ठामपणे सांगू शकतो". यावरून दोघेही खळाळून हसले. बाबासाहेब हे खरंतर संशोधकी पेशाचे असूनही "राजाशिवछत्रपती" त्यांनी एकूण एक ऐतिहासिक पुराव्यांसह पण ललित भाषेत लिहिलं आहे. म्हणूनच ते साधार चरित्र असूनही अनेकांना कादंबरी वाटते. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ७' मध्ये बाबासाहेबांनी पेशवाईतली २७ पत्रं प्रसिद्ध केली असून मंडळाचे तत्कालीन चिटणीस प्रस्तावनेत त्यांचा उल्लेख मोठ्या कौतुकाने 'तरुण इतिहास संशोधक' असा करतात. असो, हा मुद्दा वेगळा आहे, पण बाबासाहेबांचं लिखाण हे सुद्धा लोकांच्या मनावर गारुड करण्याचं कारण म्हणजे त्यांची ओघवती लेखनशैली आणि सहज-सोप्पी भाषा हेच आहे.

इनामदारांच्या कादंबऱ्यांनी वेड लावलं हे नक्की. मलाच नव्हे, अनेकांना. म्हणजे अगदी आत्ता गेल्या शुक्रवारी 'राऊ'च्या प्रकाशकांशी बोलताना कल्पना आली, आजही त्यांच्या बेस्टसेलर्स मध्ये इनामदारांच्या कादंबऱ्या या असतातच, राऊ तर हमखास ! या कादंबरीच्या यशामुळे आणि त्या प्रसंगचित्रणामुळे भन्साळीसारख्या प्रथितयश दिग्दर्शकाला त्यात चित्रपट निर्माण करण्याइतकी उत्तम कलाकृती दिसू शकते. 

सुरुवातीला जाणवायचं नाही, पण नंतर नंतर मनात विचार यायचा, हे लिहितात तरी कसं एवढं? म्हणजे त्या काळात जसं घडलं असेल तसं 'टाईममशीन'च्या बघण्यासारखं आहे हे. नुसतंच कल्पना नाही करायची तर अगदी तसं चित्रं हुबेहूब वाचकांच्या समोर निर्माण करायचं. मी माझ्या अनुभवावरून सांगतो, 'पेशवाई' लिहिताना मी स्वतः वाचकाच्या भूमिकेत होतो आणि म्हणूनच संबंध पेशव्यांचा इतिहास सोप्या भाषेत संक्षिप्त लिहिता आला. बाकी माझी सदाशिवरावभाऊ, पुरंदरे, समर्थ ही पुस्तकं अथवा इतिहासाच्या पाऊलखुणा हे नॉन फिक्शन म्हणजे ललितेतर लिखाण असल्यामुळे तिथे कसं, पुरावे मिळवायचे, ते तपासायचे, त्याचं पृथक्करण करायचं, आणि ते योग्य पद्धतीने मांडायचे एवढंच काम असायचं. हे काम काही अगदीच सोप्प नाहीये, पण अगदी कठीण आहे असंही नाही. फारफारतर काय, तुम्हाला डोकं लावावं लागतं आणि सारासार विचार करावा लागतो एवढंच. पण ऐतिहासिक कादंबऱ्या कशा लिहीत असतील हा किडा मात्र कायमच डोकं पोखरायचा. शेवटी यावेळेस म्हटलं एक प्रयत्न करून बघूच. 

आणि खरं सांगू? ललित लेखन करण्यात इतकी काय मजा असते ते मी अक्षरशः अनुभवलं. एक ऐतिहासिक कादंबरी लिहिताना तुम्ही विचार करता आणि तुमच्याही नकळत प्रत्यक्ष त्या काळात जाता. मग आसपास तुम्हाला काँक्रीटच्या भिंतींऐवजी त्या भल्याप्रचंड शनिवारवाड्याच्या दगडी भिंती दिसू लागतात. कनातीपलीकडे दक्षिणेला पार्वतीवरच्या मंदिराचा कळस चाकाकताना दिसू लागतो, दूरवर सिंहगड खुणावत असतो. वाड्यात जुन्या पोशाखात वावरणारी मंडळी दिसू लागतात. बंडी-धोतर नेसलेले पुरुष, नऊवारीतल्या स्त्रिया, परकर-पोलक्यातल्या मुली आसपास वावरत असतात. भिंतीवर कुठेतरी शस्त्र आणि पगड्या लवलेल्या असतात. सुगंधी धुपाचा दर्प दिवाणखान्यात दरवळत असतो. छताकडे पाहिल्यास लाकडी कोरीवकाम केलेली नक्षी खुणावत असते, त्यात अधूनमधून लहानमोठी झुंबरं लटकलेली असतात. कुठूनतरी पुराणिकबुवांचा आणि पुजाऱ्यांचा पूजेचा आवाज घुमत असतो. एकीकडे फडावरच्या कचेरीतल्या फडणीसांच्या कारकुनांचा कोलाहल ऐकू येत असतो. वाऱ्याच्या वेगानुसार मधूनच हजारी कारंज्याचे सहस्त्रावधी तुषार दगडी फारसबंदीवर आदळत असतात, आणि त्या आवाजाला छेदणारा फरसबंदीवरून चालत जाणाऱ्या चामडी मोजड्याचा आवाज येत असतो. मधेच झरोक्यातून लक्ष गेल्यावर अधूनमधून डोकावणाऱ्या तटावर आणि बुरुजांवर पहारेकरी भले घेऊन फिरत असल्याचं जाणवतं. अजून बरंच काही, किती सांगू आणि किती नको ! हे जेव्हा तुमच्यासोबत घडतं ना तेव्हा तुम्ही त्या काळात प्रत्यक्ष वावरत असता. माझ्यासोबत हे जेव्हा घडू लागलं तेव्हा मला क्षणार्धात इनामदारांनी इतकं कसं लिहिलं असेल याचा उलगडा झाला. 

अर्थात, ऐतिहासिक कादंबरी लिहीन म्हणजे शिवधनुष्य असतं. ती एक मोठी जबाबदारीही असते. म्हणजे ललित साहित्य असलं तरी अमुक एक गोष्ट तुम्हाला वाटते, तुम्हाला आवडते म्हणून करायची नसते. ऐतिहासिक पात्रांना आपल्याला हवं तसं ललित गद्यात वापरणं हा त्यांचा अपमान आहे निश्चितच. म्हणूनच, ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिताना त्या कालखंडाचा, त्या त्या व्यक्तींच्या इतिहासाचा, तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास असणं हे कोणत्याही परिस्थितीत गरजेचं असतं. मी कादंबरी लिखाणाला हात घालण्यापूर्वी तासनतास या गोष्टीचा विचार करत असे, म्हणजे मनात तर होतं, पण खरंच हे आपल्याला जमेल का? हा प्रश्न कायम मनाला शिवायचा. ज्या विषयावर लिहिलं तो माझा आवडता विषय, किंबहुना माझा अभ्यासाच्या विषयालाच एक भाग असल्याने पुरावे, इतिहास वगैरेंच्या बाबतीत घोळ नव्हता. ऐतिहासिक पत्रव्यवहार हा अतिशय शुष्क असतो असं म्हटलं जातं, पण मला विचाराल तर तो शुष्क मुळीच नसतो. किंबहुना पत्रंच तुमच्याशी सगळ्यात जास्त बोलतात, त्या पत्राच्या माध्यमातून त्या त्या ऐतिहासिक व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असतात. माझ्याशीही या ऐतिहासिक पात्रांनी संवाद साधले, आपलं मन मोकळं केलं. एक मानसोपचारतज्ज्ञ कसं, आधी माणूस वाचतो, मग त्याच्या समस्यांवर विचार करतो, आणि मग त्याला खरंच कशाची गरज आहे हे पाहतो. इथेही तसंच असतं. पृथक्करण (सोप्प सांगायचं तर analysis) केल्यावर तुम्हाला काय घडलं असेल याचा अंदाज नक्कीच येतो. मग काय, बाकी सगळं तुमच्या लिखाणाच्या शैलीवर आणि कल्पनाशक्तीवर अवलंबून असतं. 

या वर्षाच्या मध्यावर जवळपास चार महिने मी हे सारं काही अनुभवलं. जे जे अनुभवलं ते ते लिहून काढलं. पहिल्यावहिल्या, त्यासुद्धा ऐतिहासिक कादंबरीचं लिखाण पूर्ण झालं होतं ते एका प्रथितयश प्रकाशकांना दाखवलं आणि त्यांच्याकडून जो काही अभिप्राय आला तो भन्नाट होता. यथावकाश ही कादंबरी प्रकाशित होत आहेच, पण त्यामागची, माझ्या पहिल्यावहिल्या ललित लेखनामागची कथा सांगण्याचा हा लहानसा प्रयत्न. बहुत काय लिहिणे? लेकराचे अगत्य असू द्यावे ही विज्ञापना. लेखनावधी !!