पानिपत चित्रपटाचं परीक्षण.. माझ्या नजरेतून

आशुतोष गोवारीकरांचा बहुचर्चित पानिपत चित्रपट प्रदर्शित झाला आणि मराठी माणसांच्या ऐतिहासिक चर्चांना उधाण आलं. मला व्यक्तिशः ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट पाहावा की नाही असं वाटत होतं, पण अखेरीस पाहिला. काल चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यांत पाणी आलं म्हटल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. खरंतर अनेकांना हा चित्रपट आवडला नसेलही, किंबहुना चित्रपट न आवडण्याची कारणं अनेक असू शकतात. कोणाला त्यातला फिल्मी मसाला नसेल आवडला, कोणाला त्यातील अभिनेते-अभिनेत्री नसतील आवडल्या, कोणाला दिग्दर्शन नसेल आवडलं, कोणाला आमच्या जातीचे लोक दाखवले नाहीत म्हणून नसेल आवडलं (हो, अशीही लोकं असतील, हे वास्तव आहे, स्विकारा अथवा नाकारा) किंवा अगदी कोणाला भन्साळीचे चित्रपट आवडतात म्हणून गोवारीकरचा नसेल आवडला (जसं DC आणि MARVEL बद्दल आहे तसं). पण खरं सांगू? मी या चित्रटपटकडे केवळ चित्रपट म्हणून बघायला गेलो, मनात कसलीही ऐतिहासिक संदर्भांची अपेक्षा न ठेवता. एकदा बाजीराव-मस्तानीच्या बाबतीत ती चूक केलेली आणि अपेक्षाभंग झाला तेव्हापासून हेच ठरवलं आहे. पण काल चित्रपटाबद्दल पोस्ट टाकल्यावर वेगवेगळ्या कमेंट्स आल्या म्हणून आज चित्रटपटाचं ऐतिहासिकदृष्ट्या परीक्षण करतोय. हो, परीक्षणच, कारण हा विषय माझा आहे, माझ्यासारख्या अनेक अभ्यासकांचा आहे म्हणून हक्काने करतोय. 

सर्वप्रथम हे मला सांगावं लागेल के आपल्याकडे अजूनही लोकांची मानसिकता ही भावनिकतेवर जास्त आधारित आहे. अजूनही आपल्याला फिक्शन आणि नॉन-फिक्शन मधला फरक समजत नाही. आम्ही अजूनही कितीही ललित-गद्य असलं तरी ते वास्तवतेला धरूनच असावं असं समजतो अथवा ललित गद्यालाच वास्तव समजतो. यातला पहिला भाग चांगलाच आहे, पण दुसरा भाग, एखाद्या ललित गद्याला वास्तवता समजणं हा मात्र गंभीर आहे. बाजीराव-मस्तानीच्या बाबतीत हेच झालेलं. नशिबाने भन्साळीपेक्षा गोवारीकर हे "मराठी" असल्याने त्यांनी अगदी योग्य पद्धतीने कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. मी जे परीक्षण इथे करतोय ते चित्रपटाच्या ऐतिहासिक मुद्द्यांवर आहे हे आधीच स्पष्ट करतो. 

परीक्षण आहे म्हटल्यावर अर्थातच ऐतिहासिक बाजू आधी विचारात घेऊ, ज्या चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत-

१) चित्रपट सुरु होतानाच मुळात उदगीरची लढाई दाखवली आहे, जिथे इब्राहिमखान गारदी उदगीरचा किल्लेदार दाखवला आहे. वास्तविक इब्राहिमखान हा उदगीरच्या युद्धाच्या जवळपास तीन महिने आधीच सदाशिवरावभाऊंकडे आला होता आणि नानासाहेबांनी त्याला तोफखान्याचा प्रमुख नेमला होता. 

२) विश्वासराव आणि जनकोजी हे एकाच वयाचे होते. विश्वासरावांची पानिपत मोहीम पहिली नसून त्या आधी तीन वर्षे म्हणजे १७५७ची सिंदखेडराजाची मोहीम विश्वासरावांच्या अधिपत्याखाली झाली होती. याच मोहिमेत जनकोजी शिंदे आणि विश्वासराव हे एकत्र होते. यानंतरच्या उदगीरच्या लढाईत विश्वासराव सुद्धा हजर होते.

३) उदगीर मोहिमेनंतर भाऊ-दादा पुण्याला पुण्याला आले नाहीत. किंबहुना चित्रपटात दाखवलं आहे तसं दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर, गोविंदपंत बुंदेले वगैरे सुद्धा यावेळी पुण्याला आले नाहीत. पुण्यात कोणताही विशेष दरबार झाला नाही. उदगीर जिंकल्यानंतर लगेच उत्तरेतून दत्ताजींच्या खुनाची बातमी आली. वास्तविक उदगीरचा विजय हा फेब्रुवारी १७६० मधील आहे आणि दत्ताजीबाबा या आधी महिनाभर म्हणजे जानेवारी १७६० मध्ये मारले गेले. दत्ताजींच्या मृत्यूचं वर्तमान पुण्याला नानासाहेबांना आल्यानंतर स्वतः नानासाहेब हुजुरातीची फौज घेऊन मराठवाड्यात परतूडला आले. उद्गिरहून भाऊ आणि दादासाहेब तिथे आले. परतूडला मोहिमेवर कोणी जायचं याची वादावादी झाली आणि भाऊसाहेब तिथून फौजा घेऊन, जेमतेम सात दिवसांची विश्रांती घेऊन पुण्याला न येत परस्पर पानिपताकडे निघाले.

४) पार्वतीबाई आणि सदाशिवरावांचं लग्न (आणि प्री-वेडिंग रोमान्सही) १७६० मध्ये दाखवला आहे, पण वास्तवात या दोघांचं लग्न पानिपतच्या दहा वर्षे आधी म्हणजे २६ एप्रिल १७५०ला पुण्यात झालं होतं. 

५) पार्वतीबाई पेणच्या भिकाजी नाईक कोल्हटकर सावकारांची मुलगी. गोपिकाबाई ही सुद्धा रास्ते-नाईक सावकारांचीच मुलगी. तेव्हा या दोघींमध्ये "स्टेटस"वरून काहीही वाद नव्हता. किंबहुना बखरकार आणि काही इतिहासकार गोपिकाबाईंना जसं खलनायिका रंगवतात तासन चित्रपटातही रंगलं आहे जे चूक आहे. मुळात भाऊसाहेबांचा राधाबाईंसोबत गोपिकाबाईंनी लहानपणापासून सांभाळ केला होता. त्यांचा आणि नानासाहेबांचा भाऊंवर फार जीव होता. आणि म्हणूनच, भाऊ गेल्यानंतर नानासाहेब स्पष्ट म्हणतात, "भाऊचे हातचे पत्रं पाहिल तेव्हाच माझे बायकोचे जीवास जीव येईल". तेव्हा गोपिकाबाई पूर्णतः चुकीची रंगवली आहे.

६) दिल्लीच्या बादशहाचा सदाशिवरावभाऊंवर जास्त विश्वास होता, आणि म्हणूनच त्याने पूर्वीच भाऊसाहेबांना पत्रं लिहून "आमची योग्य व्यवस्था लावून द्या" असं कळवलं होतं. बाकी ती सकीना बेगम हे पात्रं, पार्वतीबाईची तिच्याशी भेट वगैरे सगळं अनाकलनीय. तिथे वास्तविक मालिकाजमानी हवी, आणि तिच्याशीही पार्वतीबाईंची भेट वगैरे झाली नसून भाऊसाहेबांनी तिला आणि शुजाउद्दौल्याला पत्रं पाठवली होती. 

७) मराठी फौजा, सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, जनकोजी आणि त्यातही कहर म्हणजे पार्वतीबाई वगैरे सगळे दिल्लीच्या दिवाण-ए-आम मध्ये नाचतात ही गोष्ट दाखवणं अर्थहीन आहे. तिथे गेल्यावर वास्तविक परिस्थिती वेगळी होती. दिल्ली जिंकल्याचा आनंद होताच, पण म्हणून दरबाराच्या जागेवर नाचू नये इतकी अक्कल त्यावेळा लोकांना नक्कीच होती. हेच अगदी शनिवारवाड्यातल्या गणेश रंगमहालाच्या बाबतीत. उगाच गोवारीकरांनी 'जोधा अकबरच्या' धर्तीवर गणेश रंगमहाल असेल वा दिवाण-ए-आम, तिथे गर्दी जमवून नाच दाखवायला नको होता. 

८) तहाच्या वाटाघाटी या भाऊंनी कुंजपुरा जिंकण्या आधीपासूनच सुरु होत्या. अब्दाली आणि भाऊसाहेब समोरासमोर कधीही एकमेकांना भेटले नाही. दिल्लीत मराठ्यांचा मुक्काम असतानापासून हा वतगती सुरु असून अब्दालीला श्रीहिंद (सरहिंद) आणि भाऊसाहेबांना अटक ही सीमा हवी होती असं खुद्द तेच सांगतात. पण शहावलिउल्लाह आणि नजीबखानाच्या चिथावणीमुळे अब्दालीच्या सैन्याने दबाव टाकला आणि अब्दालीला तह मोडावा लागला. यातही भाऊसाहेब एका पत्रात म्हणतात की केवळ तो म्हणतो म्हणून किंवा मी म्हणतो म्हणून हट्टाने काही होणार नाही, काहीतरी मध्य काढला पाहिजे. "लढाई न पडता सर्व प्रेत्न, आबरू राहून, होतील ते करू, (न झाल्यास) शेवटी नेटाने येकत्र जमून लढाई करू" असं भाऊसाहेब म्हणतात. 

९) पार्वतीबाई आणि विश्वासरावांची पत्नी लक्ष्मीबाई या पुढे सुखरूप पुण्याला परत आल्या. लक्ष्मीबाई इ.स. १७६३ च्या फेब्रुवारीत वारल्या तर सदाशिवरावभाऊंच्या पत्नी पार्वतीबाई या इ.स. १७८३च्या ऑगस्ट मध्ये म्हणजे पानिपतनंतर जवळपास बावीस वर्षांनी वारल्या. चित्रपटात त्या लगेच जाणे म्हणजे जरा जास्तच झालं. चित्रपटात राधाबाई दाखवल्या आहेत. वास्तविक राधाबाई म्हणजे सदाशिवरावांची आजी, जिचा आपल्या तत्वावर खूप जीव होता. पण राधाबाई इ.स. १७५३ म्हणजे पानिपतच्या ७ वर्षे आधी मृत्यू पावल्या. त्या उदगीरच्या प्रसंगातही नव्हत्या वा पानिपत प्रसंगीही. हे असलं कोणत्या इतिहास अभ्यासकाने गाईड केलं मला अजूनही समजलं नाही. बलकवडे सर हे असलं सांगणार नाहीत यावर माझा विश्वास आहे. 

१०) शनिवारवाडा म्हणजे अष्टकोनी? काहीही. नितीन देसाईंसारख्या उत्तम कलादिग्दर्शकाने किमान आत्ताच शनिवारवाडा चौरसाकृती आहे, त्याला महादरवाज्याच्या धरून एकूण नऊ बुरुज आहेत, दिल्लीदरवाजा किती प्रचंड आहे वगैरे गोष्टी नजरेआड कशा केल्या ते समजत नाही. 

चित्रपटाची जमेची बाजू

१) शनिवारवाडा सोडल्यास मला इतर कलादिग्दर्शन आवडलं. म्हणजे तोफखाना कसा असतो, तोफा उंचावताना त्या काठ्या कशा सारल्या जातात, हत्ती तोफा कसे ढकलतात इत्यादी अत्यंत योग्य पद्धतीने दाखवलं आहे. मराठी फौजांची चिलखतं आणि शिरस्त्राणं जशी हवी तशीच आहेत. अनेक जण काल म्हणाले ते युरोपिअन पद्धतीचं वाटतं, पण आपल्याकडे हे असंच असे. आधार म्हणून भारत इतिहास संशोधक मंडळातील बाजीराव पेशव्यांचं घोड्यावरील चित्रं पहा आणि त्यांच्या डोक्यावरील शिरस्त्राण पहा. रशियाच्या सेंट पिटर्सबर्ग मधील वस्तुसंग्रहालयात मराठ्यांचं जे चिलखत आहे ते असंच आहे, त्याची चित्रं नेटवर उपलब्ध आहेत ती पाहू शकता. 

२) नृत्य दाखवणं सोडल्यास चित्रपटाचं दिग्दर्शन मला आवडलं, म्हणजे उगाच नको तसले स्टंट्स केले नाहीत किंवा उगाच सुपरह्युमन्स सारख्या शक्ती त्यांच्यात दाखवल्या नाहीत ही गोष्ट उत्तम. सिनेमॅटोग्राफीच्या बाबतीतही हेच लागू होतं. फ्रेम्स अतिशय उत्तम सगळ्याच. 

३) चित्रपटात मुकझ्य असलेली लढाई, किंबहुना सैन्य चालताना जे एरियल व्ह्यू घेतलेत ते सुद्धा मस्त. पानिपतची रचना, मजनूका टीला (ज्याला चित्रपटात पानिपतचा किल्ला म्हटलं आहे) तो, ती एकंदर टेकडी वगैरे सुद्धा त्या काळच्या पद्धतीप्रमाणे उत्तम.

४) कलाकारांची वेशभूषा मला आवडली. काही ठिकाणी उगाच पेशव्यांचा श्रीमंती थाट दाखवला आहे. म्हणजे स्वतः नानासाहेब, गोपिकाबाई वगैरे एव्हीचे किलोकिलोचे दागिने अंगावर घेऊन वावरत नसत. त्यांना श्रीमंत म्हणत ते त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दल, पैशाच्या श्रीमंतीने नाही. पण ते सोडल्यास पेशवाई पगड्या, सरदारांच्या पगड्या, बाराबंदी वगैरे गोष्टी मला आवडल्या. 

माझ्या मते चित्रपटात अजून काय दाखवता आलं असतं?

१) दत्ताजी शिंदे पडले तो प्रसंग मुळात व्यवस्थित दाखवायला हवा होता. पानिपतची मोहीम सुरु होण्यास कारण तेच होतं. शिंदे-होळकर म्हणजे दौलतीचे दोन खांब असं बाजीराव आणि नानासाहेब कायम म्हणत. दत्ताजी शिंदे म्हणजे नानासाहेबांचे तर अगदी खास. म्हणजे उत्तरेत कसलीही मसलत असली तरी नानासाहेब जयाप्पा आणि दत्ताजीबाबांवर विश्वास ठेऊन ती त्यांना सोपवायचे इतकं प्रेम. यातला एक खांब उन्मळून पडला, ज्या धीराने दत्ताजींनी नाजिबाच्या दगाबाजीला तोंड दिलं, आणि शेवटी 'बचेंगे तो और भी लडेंगे' म्हटलं तो प्रसंग तरी किमान व्यवस्थित (अगदी मिनिटभराचा न दाखवता) दाखवायला हवा होता. 

२) दिल्ली जिंकल्यावर वास्तविक सदाशिवरावभाऊंनी प्रथम विश्वासरावांना सर्वांकरवी मुजरे करवले. याचं कारण बादशाह होईपर्यंत पेशवे हे तिथले सार्वभौम होते, आणि भावी पेशवा या नात्याने सदाशिवरावभाऊंनी हे केलं, जे चित्रपटात दाखवलं नाही. पण म्हणून स्वतः कायम दिल्लीचा बादशाह व्हावं अशी हाव नानासाहेबांना, भाऊसाहेबांना अथवा कोणाही सरदाराला कधीच नव्हती. किंबहुना खुद्द थोरल्या शाहू छत्रपतींनीही मुघल गादी कायम चालवावी असंच म्हटलं होतं. तैमूरची पातशाही टिकवणं आणि आपण रिमोट कंट्रोल होणं हेच उत्तम होतं. 

३) दिल्ली जिंकल्यावर खजिन्याची आणि मुख्यतः सिंहासनावरील चांदीचा पत्रा फोडून त्याची नाणी पडली ते दाखवायला हवं होतं. याशिवाय भाऊसाहेबांनी सिंहासन फोडलं नाही, त्याची शोभा राखली हे सुद्धा मुद्दाम अधोरेखित करायला हवं होतं. 

४) कुंजपुरा भाऊसाहेबांनी जिंकल्यानंतर दत्ताजी शिंद्यांचा ज्या कुत्बशहाने खून केला त्या कुत्बशहाला भाऊसाहेबांनी मारण्याचा हुकूम दिला आणि त्याचं मस्तक धडावेगळं करून ते मराठी फौजेत मिरवलं. वास्तविक मराठे एवढे क्रूर कधीही नव्हते. पण दत्ताजीबाबांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याचा बदल, त्याची दहशत नजीब वगैरे लोकांच्यात पसरावी म्हणून भाऊसाहेबांनी हा हुकूम दिला.

५) गोविंदपंत बुंदेल्यांचा मृत्यू आणि त्यांचं कापलेलं शीर अब्दाली भाऊसाहेबांना नजर करतो ते दृश्य. वास्तविक गोविंदपंत बुंदेले (मूळचे खेर) हे बाजीरावाच्या काळापासून जवळपास तीस वर्षे बुंदेलखंडात सागर वगैरे प्रांत सांभाळत होते. मल्हारराव होळकर आणि गोविंदपंत बुंदेले या दोन्ही व्यक्ती यावेळेस साथीच्या आसपासच्या म्हणजे वयस्क आहेत. अशा वेळेस एका अनुभवी म्हाताऱ्या पण कणखर सरदाराचा दग्याने मृत्यू होतो आणि त्याच केवळ मस्तक भाऊंना पाठवल्यावर भाऊ जे संतापतात ते वास्तविक दाखवायला हवं होतं. दत्ताजींनंतर हा दुसरा प्रसंग की सदाशिवरावभाऊ अब्दालीला मारण्यासाठी निकराला आले. पंतांच्या मृत्यूनंतर भाऊसाहेबांनी अब्दालीशी चाललेला तहाचा विचार बहुतांशी सोडून दिला. गोविंदपंतांनी अंतर्वेदीत (ज्याला दुआब म्हणत. दु-आब ह्मणजे दोन नद्यांच्या मधला प्रदेश) मराठ्यांचा दबदबा निर्माण केला होता आणि अब्दालीला काहीसा खीळ बसला होता. 

६) भाऊसाहेबांनी पानिपतावरून दिल्लीला असलेल्या नारो शंकर दाणीला (ज्याला दिल्ली जिंकल्यावर राजेबहाद्दर असा किताब दिलेला) मदतीसाठी निरोप पाठवला होता. पण चुकून दिल्लीहून तीनशे स्वर आणि जवळपास दीड लाख रुपये घेऊन येणार पराशर दादाजी अब्दालीच्या लोकांच्या हाती सापडला आणि मारला गेला हे सुद्धा एक-दोन मिनिटात दाखवता आलं असतं. 

७) समशेरबहाद्दरांचा राजपुतान्याच्या आसपास मृत्यू, जनकोजी शिंद्यांची अब्दालीच्या छावणीतली (तो अनभिज्ञ असताना) झालेली क्रूर हत्या इत्यादी दाखवायला हवी होती. 

८) शेवटी अब्दालीचं पत्रं दाखवलं आहे, पण ते अपूर्ण आहे. अब्दालीने नानासाहेबांना पत्रं लिहून अतिशय मनाची उंची वस्त्रं भेट म्हणून दिली, अब्दाली परत जाताना त्याने शहावलिखानाचा चुलतभाऊ याकूबअलीखानाला पुण्याला नानासाहेबांकडे पाठवलं. त्या आधी दिल्लीत हिंगणे वकिलांची भेट घेऊन आधी 'मला पेशव्यांशी तह करायचा आहे' असं म्हटल्यावरून हिंगण्यांनी व्यवस्था केली. भाऊसाहेबांनी पूर्वी अलीगौहरला बादशाह नेमायचे ठरवलेलं तेच अब्दालीने कबूल केलं. याकू पुण्याला येताना सूरजमल जाट आणि गाझीउद्दीन वकिलाने त्याला अडवून पेशव्यांकडे जाऊ नका, यावेळी आमच्याशी तह करा म्हटलं तेव्हा याकूब म्हणाला, "मला शहाने स्पष्ट कळवलंय, की पेशव्यांकडे जाऊन त्यांच्या मर्जीने सगळं करून ये". हे शेवटच्या पाच मिनिटांमध्ये "पानिपत युद्धाचं फलित" म्हणून दाखवायला हवं होतं. मराठे हिंदुस्थानची हजार कोसांवर जाऊन लढले. आणि युद्ध हरुनही अखेरीस जिंकले हे त्यातून स्पष्ट दिसतं. 

अब्दाली अखेरीस पेशव्यांच्या मर्जीने तह करायला तयार झाला , आणि यानंतर हा तह अंमलात येताना, नानासाहेब गेल्यानंतरही पुढे माधवरावांच्या दरबारात अब्दालीने मनाची वस्त्रं भेट म्हणून पाठवली यातच काय ते दिसून येतं. अशी ही एकंदर पानिपतची कथा, चित्रपटात दाखवलेली आणि मला अपेक्षित असलेली.. अर्थात, ललित गद्य म्हणून जे आहे ते शिव्या घालण्यासारखं नक्कीच नाही, प्रयत्न नक्कीच चांगला आहे, पण ऐतिहासिक संदर्भ, उत्तम असे इतिहासाचे मार्गदर्शक घेऊन सत्य इतिहासालाही अत्यंत रोचक (सिनेसृष्टीतील अपेक्षेप्रमाणे मनोरंजक, प्रेम वगैरे) दाखवता आलं असतं. 

आता शेवटचं, मी काल रडलो म्हटल्यावर अनेकांनी खिल्ली उडवली की चित्रपट फालतू आहे त्यात एवढं काही नाही वगैरे. पण खरं सांगू? भाऊ लिहिताना जी जी साधनं मी तपासली, ते जे एकेक उल्लेख वाचले ना ते भयंकर आहेत. सदाशिवरावभाऊ मारले गेले ती गोष्ट फारसी साधनांमधून अत्यंत स्पष्ट दिसते. किंबहुना मारणाऱ्या लोकांनी स्वतः आपण भाऊला कसं मारलं हे दिलं आहे. सेतुमाधवराव पगडी यांनी त्यांच्या "पानिपतचा संग्राम" या पुस्तकात ही फारसी साधनं छापली आहेत. नाना फडणवीसांनी आत्मवृत्तात "मी निघालो तेव्हा श्रीमंतांभवती पन्नास-एक स्वरांचा गराडा होता" असं म्हटलं, म्हणजे काय परिस्थिती असेल याचा विचार करा. विश्वासराव पडले, लाडका अठरा-एकोणीस वर्षांचा पुतण्या मारला गेला, उद्याचा कोवळा पेशवा मारला गेला, आता नानासाहेबांना काय तोंड दाखवू? असा विचार करून भाऊसाहेब अत्यंत भडकले, शत्रूच्या रोखाने गेले. हे जेव्हा पुस्तकात लिहिताना माझ्या डोळ्यासमोर होतं तेव्हाच खरंतर माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण तो प्रसंग गोवारीकरांनी ज्या पद्धतीने दाखवला तेव्हा मला दोन वर्षांपूर्वीचं सगळं आठवलं. जे जे मी लिहिताना पाहिलं होतं ते तसंच गोवारीकरांनी दाखवलं, हा योगायोग का काय मला माहित नाही. आणि म्हणूनच, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आत्ता याची दाहकता जाणवणार नाही, पण किमान एकदा आपण तिथे आहोत असा विचार करून पहा, तो इतिहास 'जगा', आणि मग सांगा कसं वाटतं ते.. 

आज एवढंच, बाकी, रोजच्या पानिपतच्या ससंदर्भ पोस्ट्स पुढचे काही दिवस टाकत राहणार आहेच. त्या नक्की पाहाव्यात आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात. बहुत काय लिहिणे? जाणिजे. 


© कौस्तुभ कस्तुरे

#पानिपत
#इतिहासाची_सुवर्णपाने