मराठ्यांची भूगोलविषयक माहिती

मराठ्यांकडे नकाशे बनवायची पद्धत नव्हती, या बाबतीत आपण खूप मागासलेले होते वगैरे अनेक अपप्रचार आहेत. नकाशे बनवण्याच्या कामी व त्यांच्या उत्तमतेबद्दल इंग्रज वा कोणीही युरोपिअन आपल्या काही पावले पुढे होते हे उघड आहे. आपल्याकडे तेव्हा छपाईतंत्र इतके विकसित झाले नव्हते हेही खरे आहे, पण म्हणून आपल्याकडे नकाशे बनवले जात नव्हते, आपल्याला भूगोलाची माहिती नव्हती वा केवळ स्थानिक भौगोलिक माहिती सोडता आपण अनभिज्ञ होतो हि गोष्ट मात्र खरी नाही.. पुढील कागदावरून याची कल्पना येईल. 

सरदार धुळपांचे मराठी आरमार

इ.स. १७५६ मध्ये तुळाजी आंग्र्यांच्या अंतासोबतच मराठी आरमार संपूर्ण संपले, नानासाहेबांनी मराठी आरमार नष्ट केले वगैरे अनेक गैरसमज आपण ऐकतो. पण तुळाजीच्या नंतरही मराठी आरमार तितकेच समर्थ होते, इतकेच नाही तर या आरमारात पूर्वीइतक्याच ताकदीच्या निरनिराळ्या नौका आणि नौसैनिक होते हे पुढील यादीवरून स्पष्ट होते.

ब्रिटिश लायब्ररीतील कागदपत्रे

कागद १) 
इंग्रजी अमदानीत लेण्याद्री आणि नाशिकजवळच्या डोंगरात असलेल्या लेण्यांमधील शिलालेख वाचून त्याच्या नकला करून घेण्याबद्दल दि. १५ जुलै १८१९ चा एक कागद -                              श्री 

यादी नासिकचे नजीक डोंगरात व जुनरा
जवल लेण्याद्रीत पुरातन लिप आहे त्याचे बरना (?)
हुबहू लिहून काढून त्याच्या दोन नकला बारीक
अक्षरे चितारी याजकडून लिहीवील्या त्यास
खर्च येकंदर सु|| तिसा असरे          रुये

१०      लेण्याद्रीनजीक जुनर येथे प|| त्यास खर्चास दिले 
११०    नासिकचे नजीकचे लिहिण्याकडे 
          ४५  कागद शाई व कामदार कारकून यास
                भोजन खर्च व मजूर माणसाचा रोजमरा येथे
          ६५  चितारे सोनार वगैरे आग ४ यांस येकमाही
                ४५  आग ३ दर १५ प्रमाणे
                २०  कुशाबा चितारा 
                ---
                ६५
         ------
          ११०
६०      पुणे मु|| बारीक बरफ (?) दोन नकला केल्या त्याची म
          जरी चितारे यास दरशेकडा रु|| १ प्रमाणे 
५०      नासिकास कारकून रामचंद्र हरी जोगलेकर यास ठे
          विले त्यास दुमाही
------
२३०
कागद २) 
एल्फिन्स्टनने ९ रुपये किमतीची तांब्याची चिलीम पुण्यातील रस्ते पेठेतील एका कासाराकडून विकत घेतली त्यासंबंधीचा दि. २ डिसेंबर १८१८ चा कागद -भुजेंगसेट बिन खंडूजी कासार वा|| पुणे पेठ रास्ते चिलमची तांब्या 
ची करून दिल्ही त्याजब|| रुये ९ नव भरून पावलो बडेसाहेब 
याजकडे चिलमची दिल्ही त्याजबदल रुये भरून पावलो 

कागद ३) 
कॅप्टन फोर्ड याने १२१२ रुपये किमतीची एक शालजोडी एल्फिन्स्टनला भेट द्यायला विकत घेतली त्याची ज्या व्यापाऱ्याकडून कापड घेतले त्याच्याकडून मिळालेली दि. १७ सप्टेंबर १८१८ रोजीची पावती -श्री

साहेब मेहेरवाण बुनतावत (?) जिम साहेब 
आज्ञाधारक बापू वामणे सिंपी कापडकरी पेठ बुधवार सला
म आम्ही शालजोडी १ आसमाणी रंगांची रुये १२१२ बाराशे
बारा साहेब पोट याणी खरीदी करून बडेसाहेब यास
दिल्ही ते बारासे बारा रुये एकासी आपण दिल्हे ते भरून
पावलो मिती शके १७४० बहुधान्यानाम संवछरे तारी
ख १७ सप्तंबर सन  १८१८ 
***********
शोध आणि छायाचित्र सौजन्य : 
श्री. संकेत कुलकर्णी (लंडन)
ब्रिटिश लायब्ररी, लंडन

लिप्यंतर : कौस्तुभ कस्तुरे        

लेखनप्रशस्ती

अनेकदा आपण ऐतिहासिक पत्रात मोकळ्या जागा पाहतो, उदाहरणार्थ "श्री__स्वामी", "श्री__चे" वगैरे. याचं कारण काय असावं असा प्रश्न अनेकांना पडतो. याकरिता अशी पत्रे नीट पहिली असता कोणत्याही देवस्थानला किंवा साधुसंताना लिहिलेल्या पत्राच्या उजव्या कोपऱ्यात, माथ्यावर देवतांची अथवा संतांची नावं लिहिलेली असतात. अशा वेळी पुढे पत्रात केवळ मोकळी जागा ठेवली जाते. यामागचा उद्देश असा, की एखाद्या पत्रात आपल्याहून मोठ्या पदावर असलेल्या माणसाचं अथवा देवाचं नाव आपल्या नावाच्या खाली येऊ नये !

शिवरायांचे जावळीचा देशाधिकारी आबाजी मोरदेव यास रामदासस्वामींबद्दल पत्र

दि. ३१ मार्च १६७६ रोजी, म्हणजेच राज्याभिषेकच्या दुसऱ्या शकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जावळी प्रांताचा देशाधिकारी आबाजी मोरदेव याला आज्ञा केली. काय ? तर कसबे चाफळ येथील श्री रघुनाथाचे देवस्थान, कसबे नाणेघोळ आणि कसबे कराड येथील देवालये येथील नित्य पूजा आणि तिथल्या देवाच्या सेवकांना वेतन तसेच श्री रामदासस्वामी जिथे कुठे असतील, त्यांच्या सोबत जो शिष्यसमुदाय असेल त्यांच्यासाठी नुकतीच सनद सादर केली आहे (हि चाफळची जुनी, पहिली सनद होय).