सम्राट चंद्रगुप्त आणि आर्य चाणक्य


भगवान गौतम बुद्धांचा ज्या जातित अथवा परिवारात जन्म झाला त्या ‘शाक्य’ ज्ञातिच्या काही टोळ्या निरनिराळ्या प्रांतात जाउन राहिल्या. यातीलच काही गट ज्या उत्तर पूर्वेच्या रानात राहू लागले तेथे मोर फार मोठ्या प्रमाणावर होते. राजघराण्यासाठी लागणार्‍या कित्येक वस्तुंमध्ये मोरपीसांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे, म्हणून उपजिविकेसाठी ही लोकं मोर पाळण्याचा आणि ते विकण्याचा व्यवसाय करू लागली. म्हणून शाक्यांच्याच या प्रजातींनी स्वतःला ‘मोरीया’ असे नाम धारण केले.
या मोरीया जातितील एक परिवार पाटलीपूत्रच्या आसमंतात येऊन राहू लागले. त्यातील ‘मूरा’ (मथुरा) नावाच्या एका महिलेचा पाटलीपूत्रच्या राजवाड्यात दासी म्हणून प्रवेश झाला. तत्कालीन मगधचा सम्राट महापद्मनंद उर्फ धनानंद याच्या सानिध्यात सेवा करताना या मूरेला धनानंदापासून एक पूत्र झाला. काही इतिहास संशोधकांच्या मते मथुरा ही दासी नसून राणी होती (बाजीरावसाहेबांच्या मस्तानीबद्दल जो वाद आहे अगदी तसाच वाद आहे हा !). यामूळेच, मूरा अथवा मथुरेचा पूत्र म्हणून चंद्रगुप्त हा पूढे स्वतःला ‘मौर्य’ म्हणवून घेत असे. यात आणखी एक तर्क असा की मोरीया या जातिवरून त्याने मोर्य म्हणवून घेण्यास प्रारंभ केला असावा. (जसे पूर्वीच्या काळी जातिवरून उपनाम ठरवले जात असे, उदा. मायनाक भंडारी, राम कोळी, पंडीत (ब्राह्मण), इत्यादी अनेक) ! चंद्रगुप्त हा आपले कुलदैवत म्हणून ‘मोर’ मानत असे. आजवर सापडलेल्या कार्ले, सांची, श्रवणबेळगोळ, नंदनगड इ. ठिकाणच्या सर्व शिलालेखांच्या खाली आणि सम्राट अशोकाने उभारलेल्या अशोकस्तंभांच्या तळाशी मोराची चित्रे असल्याचे आढळून आले आहे.
          मगधसम्राट धननंद उर्फ महापद्मनंद हा अतिशय दूर्गुणी होता. आर्यांच्या प्रचंड अशा ‘मगध’ या महाजनपदावर असा निर्बुद्ध राजा बसल्याने मगधची प्रजा अतिशय संत्रस्त झालेली होती. या अतिशय भित्र्या राजाला चंद्रगुप्तासारखा मुलगा झाला हे मगधचे नशिब ! चंद्रगुप्ताचा करारीपणा धनानंदाला प्रथमपासूनच त्याच्या वागण्या-बोलण्यातून जाणवू लागला होता. महापद्मनंदाला अशी भीति वाटू लागली की आपल्या सभोवती असणार्‍या देशभक्त राजकारण्यांचा गट या आपल्याच पुत्राला हाताशी धरून आपल्याला गादीवरून पदच्युत करेल. मगधच्या सध्याच्या नंद राजवंशाने याआधिच्या नाग वंशाला असेच पदच्युत करून आपला वंश स्थापन केलेला होता. त्यामूळे कोणत्यातरी कारणाने त्याने आपल्याच या पुत्राला राज्याच्या सीमेपार जाण्याची कठोर आज्ञा दिली. यानंतर तो तरूण राजपुत्र प्रकटला तो थेट तक्षशिलेच्या त्या पवित्र विद्यापिठातच ! पूर्ण सात वर्षे चंद्रगुप्ताने तक्षशिलेत शिक्षण घेतले. यावेळेसच ग्रिक राजा अलेक्झांडरची हिंदुस्थानवर स्वारी होऊन पोरस राजाचा पराभव झालेला होता.
अलेक्झांडरचा तळ तक्षशिलेच्या जवळच पडलेला असताना, आपल्या पराक्रमी आर्यसम्राटांना हरवणार्‍या ग्रिकांच्या सैन्याची वैशिष्ट्ये तरी कोणती आहेत हे पाहण्यासाठी चंद्रगुप्त अलेक्झांडरच्या तळात शिरून पाहणी करत असे. अखेर एकदा चंद्रगुप्त पकडला गेला. अलेक्झांडरने चंद्रगुप्ताला समोर हजर करण्याची आज्ञा केली. अगदी फारच कमी वेळ ही भेट झाली, परंतू या भेटीत चंद्रगुप्त हा आर्यांच्या प्रसिद्ध मागधांशी संबंधीत आहे हे समजल्यानंतर त्याला बाहेर हाकलून देण्याची अलेक्झांडर ने आज्ञा दिली. तो मागधराजाचा पुत्र असल्यानेच घाबरून अलेक्झांडरने त्याला मारण्याचा आदेश दिला नाही, कारण अलेक्झांडर कितिही वल्गना करीत असला तरीही मागधांच्या मार्‍यासमोर आपला टिकाव लागणे केवळ अशक्य आहे हे तो देखिल जाणून होता.
सम्राट चंद्रगुप्ताच्या आयुष्यात आर्य चाणक्य या महापंडिताचा फार मोलाचा वाटा आहे. आर्य चाणक्य हा ब्राह्मण होता. त्याचे मुळ नाव होते ‘विष्णूगुप्त’. परंतू आपल्या ‘चणक’ या गावावरून त्याला चाणक्य असे म्हणत असत. तत्काली ब्राह्मणांमध्ये गोत्रांवरून उपनाम ठेवले जात असे, म्हणून ‘कुटील/कुटल’ या ऋषींच्या गोत्रावरून तो स्वतःला कौटील्य असेच म्हणत असे. हिंदुस्थानच्या तत्कालीन वातावरणात एक महापंडीत म्हणून कौटील्य उर्फ चाणक्याची ख्याती सर्वत्र दुमदुमत होती. तो तक्षशिलेच्या विद्यापिठाचा मुख्य कुलगुरू होता.
आर्य चाणक्याच्याबद्दल एक अतिशय विकृत आख्यायिका (मुद्दाम?) पसरवली जाते की, त्याच्या दातांविषयी आणि कुरूपतेविषयी कुचेष्टा करून धनानंदाने त्याला पाटलीपूत्रातून बाहेर हाकलून लावले. पण मुळात हे सारे अतिशय चूकीचे आहे. खरी गोष्ट अशी -
मगधला जाण्यापूर्वीपासून चाणक्य हा तक्षशिलेचा कुलपती होता आणि त्याच्या विद्वत्तेची कीर्ति दशदिशांत पसरलेली होती. अलेक्झांडरने आर्य महासम्राट पोरसचा केलेला पराभव या देशभक्ता चाणक्याच्या जिव्हारी लागला. तत्कालीन आर्यावर्त किंवा हिंदुस्थानात मगध हे अतिशय बलाढ्य असे महाजनपद होते. आणि आर्यांवर आलेल्या या संकटाला दूर करणे हे मगधसम्राट महापद्मनंदाचे मुख्य कर्तव्य होते. परंतू नंद सम्राटाकडून अशी कोणतीही हालचाल होत नसल्याने चाणक्याला अतिशय खेद झाला आणि तो या सार्‍या गोष्टींचा अभ्यास आणि विचार करत मगधमध्ये येऊन फिरू लागला. चाणक्यासारखा महापंडीत आपल्या राज्यात आलेला पाहून, त्याचा खरा हेतू न समजून धनानंदाने चाणक्याला आपल्या राज्याचा ‘दानाध्यक्ष’ म्हणून नेमले. चाणक्याला हेच हवे होते, राजवाड्यात प्रवेश मिळाल्यावर त्याचे काम अतिशय सोपे झाले. परंतू काही काळानंतर चाणक्य हा नुसता महापंडीत नसून एक प्रख्यात कुटनीतिज्ञ आहे आणि आपल्याविरुद्ध काहीतरी भयानक मनात धरून तो येथे आलेल आहे हे धनानंदाला समजताच त्याने चाणक्याला हाकलून लावले. यानंतर चाणक्य पुन्हा तक्षशिलेला निघून गेला. तो कुलपती असल्याने धननंदाचा पुत्र आपल्या विद्यापिठात शिकत असल्याचे चाणक्यालाही माहित होतेच, आणि चाणक्याची सारी कुलकथाही त्याला ठावूक होती. त्यामूळेच धनानंदाचा पूत्र म्हणून त्याला पाठींबा दिल्यावर होणारा विरोध कमी होऊन हा सर्वगुणसंपन्न राजा आर्यावर्ताचे कल्याण करेल या दिव्य हेतूनेच चाणक्याचे चंद्रगुप्ताला पाठिंबा दिला आणि त्याला मागधसम्राट करण्याचा दृढनिश्चय केला. याच सुमारास अलेक्झांडर मरण पावला आणि त्याच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांतच अलेक्झांडरने जिंकलेले सारे आर्यप्रांत पुन्हा स्वतंत्र झाले. या सार्‍या क्रांतिचे श्रेय ग्रीक इतिहासकार अलेक्झांडरलाच देतात. प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार जस्टीन म्हणतो,
 ‘...Indians, after the death of Alexander, had shaken as it were, the yoke of servitude from its neck & put his (Alexander’s) governors to death. The author of this liberation was Sandrocottus... ’
या वाक्यातील सँड्रोकोटस म्हणजे चंद्रगुप्त. ग्रीक लोक चंद्रगुप्त या नावाचा उच्चर असाच करीत असत.
अखेरीस चंद्रगुप्त आणि चाणक्यानी मगधवर स्वारी करण्याचा निश्चय केला. चाणक्याने सैन्य उभारणीलाही सुरूवात केली. अलेक्झांडरकडून पराभूत झालेला पुरू राजा, (पोरस) ज्याला पर्वतेश्वर म्हणत असत, त्याला स्वतः चाणक्य जाऊन भेटला आणि त्याचा पाठिंबा मिळवला. हळूहळू एकेका प्रांतावर आक्रमण करत चंद्रगुप्त-चाणक्याने ते भाग आपल्या नव्या साम्राज्याला जोडले. इकडे चाणक्याने आपल्या हस्तकांकरवी धनानंदाचे साम्राज्यही पोखरून ठेवलेच होते. धनानंद हा षंढ होता, त्याला पराक्रम कशाशी खातात हेही ठावूक नव्हते. चंद्रगुप्ताच्या झंझावाती फौजा पाटलीपूत्रावर (पाटण्यावर) चालून येत आहेत हे पाहताच घाबरून गेलेला धनानंद पळून जाऊ लागला. परंतू पाटलीपूत्राच्या बाहेर पडत असतानाच चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी त्याला पकडले आणि त्याचा सम्राट चंद्रगुप्तासमोर शिरच्छेद करण्यात आला. ही सारी राज्यक्रांती इसवी सन पूर्व ३२१ मध्ये घडली, म्हणजे अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर केवळ दोन वर्षात आर्य चाणक्यासारख्या एका पंडिताने चंद्रगुप्ताला गादीवर बसवून आर्यावर्तात एक नवा अध्याय लिहीण्यास सुरूवात केली. चंद्रगुप्त सिंहासनावर अधिष्ठीत होताच त्याने सर्वप्रथम ज्या महान माणसामूळे हे सारे घडून आले त्या आर्य चाणक्याला आपला मुख्य प्रधान म्हणून नेमले. आर्य चाणक्यानेही एक क्षणही विश्रांती न घेता प्रथम आपल्या मगध राज्यात आणि नंतर अखिल आर्यावर्ताच्या अंतर्गत शांती आणि सुव्यवस्था स्थापण्यास प्रारंभ केला. चाणक्याने आपल्या अर्थशास्त्र य ग्रंथाच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, ‘चाणक्य इति विख्यातः श्रोत्रिय सर्वधर्मविद्‍ । येनं शस्त्रं चं शास्त्रं चं नंदराजगता च भूः॥’ म्हणजेच, ‘नंदाचा उच्छेद करून राष्ट्रीय शस्त्रशक्ती आणि शास्त्रशक्तीचे ज्याने रक्षण केले तो हा चाणक्य!’...
महासम्राट चंद्रगुप्त आणि चाणक्या यांच्याविषयी कृत्रिम पद्धतीने विकृत लेखन करून गैरसमज पसरवले जात आहेत म्हणून केवळ यासाठी हा सर्व लेखनप्रपंच.. बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असू द्यावे... ॥ लेखनसीमा ॥