दि. ३० जुलै २०१३
घाशीराम कोतवाल .. आजही महाराष्ट्रात हे नाव उच्चारलं की मराठी
माणसाच्या डोळ्यासमोर प्रथमतः येतं ते प्रख्यात नाटककार आणि लेखक कै. श्री. विजय
तेंडूलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक. या नाटकाने महाराष्ट्रात
प्रचंड गदारोळ उडवून दिला. वास्तविक हे नाटक लिहीताना या नाटकाचे लेखक स्वतःच
प्रस्तावनेत त्याचा उल्लेख ‘अनैतिहासिक दंतकथा’ असा करतात, परंतू नाटकातील पात्र ही मात्र अस्सल
ऐतिहासिक असल्याने साहजिकच लोकांच्या मनावर या व्यक्तिंच्या चारित्र्याचा असा
विपरीत ठसा उमटवला गेला आहे. यातील दोन प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहेत त्या
म्हणजे, नाना फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांच्या !

कलम
१ - कोतवालीचा अंमल सुदामत चालीप्रमाणे करणे. ईमाने ईतबारे वर्तत जाऊन रयेत आबाद
(सुरक्षित) राखणे व गैर वाजवी परिछिन्न न करणे.
कलम
२ – नारायण व शनिवार पेठेत कोतवालचावडी
नसल्याने तेथे फंद्फितुरी व हालीहरामी समजत नाही. सबब तेथे चावड्या घालून
फंद हितुरी याची बातमी यथास्थित राखून सरकारात समजावित जाणे.
कलम
३ – शहरातील रस्ते चांगले राखावे. पडवी, वोटे (ओटे) पुणे जळाल्यावर
(निजामाने पूर्वी जाळल्यानंतर) नवे परवानगी शिवाय जाले असतील ते मोडून टाकणे. पुढे
होऊ देऊ नये.
कलम
४ – शहरात रात्रीची गस्त कोतवालीकडील फिरत्ये त्याजबरोबर कारकून व प्यादे चौकस देत
जाऊन रात्रीच्या गस्ती नेहमी फिरऊन बंदोबस्त राखित जाणे व बारकाईने चोरांचा पत्ता
लाऊन चोर धरून आणून सरकारात देणे.
कलम
५ – कोतवालीचा हिशोब महिनेमहाल सरकारांत महिना गुदरताच पडले पान तफावत न करीता देत
जाणे.
रात्रीच्या
वेळेस पुण्याच्या रस्त्यांवर जागता पहारा, शहरात येणार्या-जाणार्यांची कसून
तपासणी, शहराची सुरक्षा, शहरातील
फंदफितुरी, चोर्या-जुगार रोखणे,
शहराची स्वच्छता इत्यादी कामे त्याच्या काळात बिनाकसूर केली जात होती, याबाबत पेशव्यांचा बखरकार म्हणतो, “ऐसी कोतवाली
मागे कोणी केली नाही व पुढेही करणार नाही”. परंतू त्याच्या हातून एक कृत्य मात्र असे घडले
की त्यामूळे तो एक बदमाश आणि विकृत मनोवृत्तीचा कोतवाल आहे अशी पुढे जनसामान्यांची
समजूत झाली. त्याचे हे कृत्य खरोखरच कोतवालाला काळीमा फासणारे होते. पेशवे बखरीत
आलेली माहिती अशी- “श्रावणमासी तेलंग देशातले ब्राह्मण दक्षिणा घेऊन भाद्रपदमासीं
आपल्या देशात जावयास निघाले. ते घाशीराम कोतवाल याचे बागेत जाऊन उतरले. ही बातमी
कळताच घाशीराम याणे शिपाई पाठवून, सारे ब्राह्मण पंचवीस-तीस
होते ते लुटून घेऊन त्याबागेत एक लहानशीं कोठडी होती तींत नेऊन कोंडिले; आणि बाहेरून कवाड लाऊन कुलूप घातले. तेव्हा जागा लहान, आत वारा नाही, असें दीड दिवस (ते तेलंगी ब्राह्मण)
तेथे होते. त्यामूळे सारे ब्राह्मणमृत्यू पावले. त्या कोठडित लहानसे गवाक्ष होते.
त्या गवाक्षाशीतोंड लावून जे उभे होते त्यांचा प्राण वाचला. अगोदर गर्मी, आत वारा नाही, व दोन दिवस अन्न नाही त्यामूळे त्या
दोघा ब्राह्मणांचा प्राण व्याकूळ होऊन जीव मात्र राहीला होता. ” या प्रकारानंतर तिसर्या
दिवशी मानाजी फाकडे हा तेथून जात असताना
गवाक्षातील त्या ब्राह्मणांनी आरडाओरडा केला असता मानाजी फाकडे यांनी शिपायांना
सांगून कुलूप तोडवले आणि आतीलप्रेते बाहेर काढली. केवळ दोन
ब्राह्मण जिवंत उरले होते. यानंतर मानाजीने हा प्रकार शनिवारवाड्यात जाऊन थेट सवाई
माधवराव पेशव्यांच्या कानावर घातला. पेशव्यांनी दोनदा ढालाईत पाठवूनही घाशिराम आला
नाही. त्याला वाटत होते की नाना आपल्याला पाठीशी घालतील, पण
नानांनी त्याला स्पष्ट सांगितले, “तुझे कपाळ फुटले, आता आमचा उपाय नाही”.
यापुढे पेशव्यांचा बखरकार म्हणतो, “ श्रीमंतांनी
ऐकल्यावर हुकूम झाला की ‘पागोटे फाडून,
मुसक्या बांधून छड्या माराव्या’. त्यासमयी ढालाईत यांणी आरंभ
केला. छड्या मारल्यावर पायात बेडी ठोकून तोफखान्यात पानशे यांजकडे पाठवून दिला.
नंतर ब्राह्मण जमा झाले त्यांजकडे श्रीमंतांनी बाळाजीपंत केळकर यांचे हाते सांगून
पाठवले की, ‘आता रात्र झाली आहे. आता
तुम्ही सर्वांनी असेच असावे. प्रातःकाळी घाशीराम याची शहरात धींड फिरवून तुमचे
स्वाधीन करू. मग तुम्ही त्याला मारा किंवा ठेचा... मग प्रातःकाळ झाल्यानंतर चार घटका दिवसास
घाशिराम यास (शनिवार)वाड्यात आणिले. फिरुन (पुन्हा) श्रीमंत यांणी समक्ष विचारीले,’ते भामटे किंवा कोमटी होते ते सांग’ तेव्हा घाशीराम
याणे उत्तर केले नाही. मग वाड्यातून बाहेर काढून चावडीपाशी झेंड्याखाली आणून
मुसक्या बांधून उंटावर उलटा तोंड करून बांधीला; आणि डोकीचे
पाच पाट काढून, तेल शेंदूर वरती घालून,
दवंडी पुढे देऊन सोळा पेठा शहरच्या फिरून शेवटी चावडीपासी आणिला... नंतर घाशीराम
यास गुलटेकडीकडे नेऊन उंटावरून सोडून ब्राह्मणांचे स्वाधीन केला. तेव्हा त्या
ब्राह्मणांनी घाशीराम याला दगडाखाली मारून ठार केला. असे पारपत्य घाशीराम याचे
झाले ”.
घाशीराम आपण केलेल्या कृत्याचे फळ
पावला. पण आता प्रश्न उरतो तो पेशव्यांनी स्वतः घाशीरामाला शिक्षा न देता
ब्राह्मणांच्या स्वाधीन का केले. याचे उत्तर पेशवे बखरीतच आहे. या सगळ्याचे मूळ
जाते मानाजी फाकड्यांकडे ! मानाजी फाकडे हा कण्हेरखेडच्या शिंदे घराण्यातलाच एक
पराक्रमी पुरुष. फाकडा या शब्दाचा अर्थ आहे ‘शूर’. मानाजी
फाकडे हा चिंतो विठ्ठल रायरीकर, मोरोबादादा फडणीस, सखो हरी गुप्ते यांच्यासारखाच पूर्वीपासूनच रघुनाथराव पेशव्याचा कट्टर
पक्षपाती होता. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात राघोबादादाने महादजींना
पदच्यूत करून मानाजीलाच शिंद्यांच्या फौजेचा म्होरक्या बनवले. परंतू पुन्हा
माधवरावांनी महादजीची नेमणूक केली. नारायणरावांच्या खूनानंतर रघुनाथरावांच्या
विरोधात उठलेल्या बारभाईंना मानाजीने सळो की पळो करून सोडले होते. पुढे
रघुनाथरावांच्या मृत्यूनंतर इतरांप्रमाणे मानाजीही पेशव्यांना शरण आला. परंतू
बारभाईंमधल्या मुख्य असणार्या आणि पूर्वीच्या अंतस्थः शत्रू असणार्या नानांविषयी
मानाजीचे शत्रूत्व कमी झालेले नव्हते. पूर्वी घाशीरामाची नियुक्ती नानांनी केली
असल्याने आता हे आयते प्रकरण ओढवले ते बरेच झाले असे समजून मानाजीने ‘नाना फडणवीस घाशीरामाला पाठीशी घालत आहेत’ असा
प्रचार सुरु केला आणि पुण्यातल्या ब्राह्मणांना नानांच्या विरोधात उठवले. पेशवे
बखरीतील मजकूर असा, “ त्यासमयी दोन ब्राह्मण जिवंत होते
त्यांजपासी चार शिपाई रखवालीस ठेवून मानाजी फाकडे तसेच शहरात येवून, वाटेने सर्व ब्राह्मणांस हाका मारून त्यांनी वर्तमान सर्वांस जाहीर केले, आणि सर्वांस सांगितले की ‘ब्राह्मण असेल त्यानी
(शनिवार)वाड्यापाशी यावे’ असे सांगून मानाजी फांकडे
श्रीमंतांकडे जाऊन पाहतात तो श्रीमंत निजले आहेत. इतके कर्मास तीन प्रहर लोटले.
सायंकाळचा समय. लोक दरबारांत यायची वेळ. इतक्या संधीत वाड्याभोवते पांच सात हजार
ब्राह्मण जमले. तेव्हा जो कोणी पालखीत बसून येईल त्यास पाहून, ब्राह्मण आहे असे ओळखून आपले जमातींत (पक्षात) बसवावे अशा पालख्या आल्या
तितक्या तेथे बसविल्या. मग श्रीमंत निजून उठल्यानंतर श्रीमंतांची गाठ मानाजी फाकडे
यांशी पडली. तेव्हा सारा मजकूर इत्थंभूत श्रीमंतांचे कानावर घातला ”. या वरून एक
गोष्ट अशी दिसून येते की, मानाजी फाकडे याला फारफारतर घडलेला
प्रकार श्रीमंतांचे कानावर घालणे अगत्याचे असताना, मध्येच
येता येता शहरातील सर्व ब्राह्मणांना भडकवून वाड्यावर मोर्चा काढण्याची काय गरज
होती ?
तेंडूलकरांचे ‘घाशीराम’ रंगमंचावर आल्यानंतर थोड्याच अवधीत, दि. २५
फेब्रुवारी १९७६ या दिवशी ‘केसरी’
वृत्तपत्रात या नाटकासंबंधी आणि तत्कालीन इतिहासाचा उहापोह करणारा एक लेख छापून
आला होता. ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. श्री ग. ह. खरे आणि साहित्यसम्राट न.
चिं.केळकरांचे पुत्र कै. श्री य. न. केळकर यांच्या मुलाखती त्या लेखात घेण्यात
आल्या होत्या. ग. ह. खरे म्हणतात, “हा
एक शिमग्यात करावयास शोभण्यासारखा तमाशाच आहे. यात फक्त दोनच ऐतिहासिक पात्रे
आहेत. नाना आणि घाशीराम. घाशीराम जितक्या उफराट्या काळजाचा दाखवीला आहे, त्याच्या शतपट नाना फडणीस स्त्रीलंपट, उफराट्या
काळजाचा आणि भित्रा रंगवलेला आहे. एवढेच नव्हे तर नानाच्या एकंदर जिवनाचे जितके
खोटेनाटे, हिडीस, विलक्षण घृणा यावी
असे चित्रण केलेले आहे. नाना फडणीस इतका वाईट असता तर सुमारे पंचवीस वर्षे इंग्रज
मराठ्यांच्या राजकारणात बोटही शिरकावू शकले नाहीत हे कसे शक्य झाले असते ? काडीचाही आधार नसता एका कर्तृत्ववान ऐतिहासिक पुरुषाविषयी राईचा पर्वत
करणे हे समाजा विषयी सद्भाव प्रेरीत असणार्या माणसाला मुळीच शोभणारे नाही ”.
इतिहास संशोधक य. न. केळकर यांनीही
स्पष्ट केले की, “या नाटकाला नाममात्र आधार आहे आणि तो देखिल एका दंतकथेचा. आणि ती
दंतकथाही बिनबुडाची. म्हणजे घाशिराम कोतवाल याला ललितागौरी नावाचीमुलगी होती याला
कोठेही (अस्सल) आधार नाही. महादजी शिंदे
यांची लालन बैरागिण नावाची प्रेयसी जितकीकाल्पनिक तितकीच घाशीरामाची मुलगी काल्पनिकच
आहे... दुसरं उदाहरण म्हणजे बावनखणीचं. नाना फडणीसाच्या काळात बावनखणीचा उल्लेखही
मिळत नाही. १८४७ साली (म्हणजे नानांच्या मृत्यूनंतर ४७ वर्षांनी) प्रथम त्याचा
उल्लेख पुण्यातील पेठा, पुरे, गंज, आळी आणि वळी यांच्या मोजणीत आलेला आहे. समजा त्या काळीतशी वेश्यांची
वस्ती असती तरी नाना फडणीस चवली-पावलीकडे कसा जाईल ?”.
नाना फडणवीसांविषयीच्या
नाटकशाळांबाबतही लोकांच्यात अनेक गैरसमज पसरवण्यातआले. पण नाटकशाळा पदरी बाळगणारे
नाना एकटेच होते काय ? शहाजी महाराजांपासून शेवटच्या छत्रपतींपर्यंतच्या राजांनी (थोरल्या
शिवछत्रपतीमहाराजांना वगळून) नाटकशाळा बाळगल्याचे अस्सल ऐतिहासिक दाखले आहेत.
बाळाजी विश्वनाथांपासून सार्या पेशव्यांच्या नाटकशाळा होत्या. वास्तविक त्याकाळी
नाटकशाळा बाळगणे हे नीतिबाह्य समजले जात नसे. दौलतराव शिंदे,
सासरा सर्जेराव घाटगे यांच्या रासलीला इंग्रज इतिहासकारांनी प्रत्यक्ष पाहून
लिहील्या आहेत, पण काहीही कारण नसताना तेंडूलकरांकरवी बळी
दिला गेला तो नाना फडणवीसांचा ! केळकरांनी अखेरीस स्पष्ट शेरा दिलेला आहे की
“वास्तविक खरा आधार नसताना ब्राह्मण जातीला झोडपण्याकरता नानांचे प्रतिक वापरून
भलभलते चित्रण करून या नाटकात केवळ
नानांचेच चारित्र्यहननच केलेले नसून जातिजातित द्वेष उफाळण्याचे दुष्कृत्य केले
आहे. त्या काळातील पुण्यातील खरी स्थिती अतिशय सुस्थित,
नैतिक व व्यावहारिक कायदेकानुप्रमाणे चाललेली होती. इतर मराठे सरदारांच्या
संस्थानातूनजी स्थिती होती त्यापेक्षा नानांच्या पुण्यात दसपट निरोगी स्थिती होती
यात शंका नाही. म्हणूनच इंग्रजांनी ‘नाना फडणीसांबरोबर मराठी
राज्यातील संयम व शहाणपण लयास गेले’ असे जे म्हटले ते खरेच
आहे”.
एकूणच काय, ‘घाशीराम कोतवाल’ प्रकरणात घाशीरामाचे दुष्कृत्य उघडे
करण्याऐवजी त्याचा बहुतेक करून दोष नाना फडणवीसांकडेच दाखवला जातो. वास्तविक पाहता
थोरल्या नानासाहेबांच्या काळात नानासाहेबांच्या हुशारीमूळे,
नंतर थोरले माधवराव- रघुनाथरावाच्या प्रकरणात माधवरावांमूळे आणि त्यानंतरही दुसर्या
बाजीरावांच्या कारकीर्दीपर्यंत या अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय कारभार्यामूळेच
इंग्रजांना मराठेशाहीत प्रवेशकरता आला नाही तो केवळ नाना फडणवीसांमूळेच. १७ मे
१७८२ रोजी झालेल्या पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची परिणीती असलेल्या साल्बाईच्या
तहाला नानांचा पाठींबा नव्हता, पण महादजी शिंद्यांच्या
हट्टापुढे नानांनी तहाला मान्यता दिली, आणि मार्च १७८६ मध्ये
इंग्रजांचा वकील सर चार्लस् मॅलेट हा पुणे दरबारी राजनीतीक प्रतिनिधी (रेसिडेंट)
म्हणून रुजू झाला. दि. १३ मार्च १८०० या दिवशी नानांचा मृत्यू झाला आणि लगेच
पुढच्या २ वर्षात वसईच्या तहाच्या निमित्ताने इंग्रजांचा मराठ्यांच्या प्रत्यक्ष
राज्यव्यवहारात प्रवेश झाला. या सार्यावरून आणि इतिहासाची अस्सल साधने तपासली
असता नाना फडणवीसांच्या योग्यतेचा दुसरा माणूस उत्तर पेशवाईत झाला नाही हेच सत्य
अभिमानाने मान्य करावे लागते. घाशीराम कोतवाल सारखे नाटक लिहीताना किंवा इतरही
ऐतिहासिक कादंबर्या लिहीताना लेखकाने आपल्या कलाकृतीत केवळ रोचकता आणण्यासाठी मूळ
इतिहासात फेरफारकरणे हे अतिशय दुर्दैवी आहे. घाशीरामाचे दुष्कृत्य हे क्षमेस पात्र
ठरूच शकत नाही, परंतू किमानपक्षी नानांसारख्या अशा सत्शिल
ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे चारित्र्यहनन तरी केले जात नाही याची काळजी घेणे अतिशय
आवश्यक आहे.
*
घाशिरामाचे संपूर्ण करारपत्र ‘सातारकर महाराज व पेशवे यांची रोजनिशी’ मधील सवाई माधवराव विभाग ३ मध्ये छापले आहे.
Copyrights : कौस्तुभ सतीश कस्तुरे
kasturekaustubhs@gmail.com