आपल्यापैकी बहुतेकांनी
साधारणतः शिवाजी महाराजांच्या काळातली अथवा पेशवाईतली अस्सल ऐतिहासिक पत्रं पाहिली
असतीलच ! ही पत्रं, पाहिल्यावर बहुतेक जण मनातल्या मनात विचार करतात,
तर काही तो बोलूनही दाखवतात, “शिवाजी महाराज ‘मराठी’ होते ना? मग या कोणत्या
विचित्र भाषेत पत्र लिहायचे?” पण जेव्हा त्यांना हे समजतं की
ही पत्र मराठी भाषेतच आहेत तेव्हा मात्र त्यांचा विश्वासच बसत नाही ! कारण आपल्याला
मराठी ही नेहमी ‘देवनागरी’ लिपीतच
वाचायची सवय असते. परंतू मराठी ही देवनागरी प्रमाणेच ‘मोडी’ या लिपीतही लिहीता येते.
महाराष्ट्राच्या इतिहासातील बहुसंख्य कागद हे मोडी लिपीत आहेत. वास्तविक पाहता, आपल्याकडे वाङ्मय निर्मितीसाठी पूर्वीपासून देवनागरी अथवा बाळबोध लिपीचाच वापर केला जात असे. परंतू राज्यकारभाराच्या दृष्टीने ‘मोडी’ ही सोयीची असल्याने मध्ययुगात, साधारण बाराव्या शतकापासून मोडी लिपीचा वापर लिखाणासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.
महाराष्ट्राच्या इतिहासातील बहुसंख्य कागद हे मोडी लिपीत आहेत. वास्तविक पाहता, आपल्याकडे वाङ्मय निर्मितीसाठी पूर्वीपासून देवनागरी अथवा बाळबोध लिपीचाच वापर केला जात असे. परंतू राज्यकारभाराच्या दृष्टीने ‘मोडी’ ही सोयीची असल्याने मध्ययुगात, साधारण बाराव्या शतकापासून मोडी लिपीचा वापर लिखाणासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.
मोडीची उत्त्पत्ती आणि तिचे आगमन याबाबत
आपल्याकडे तज्ञांमध्येच अनेक मतमतांतरे आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की
मोडी लिपी ही देवगिरीच्या यादव साम्राज्याचे, सम्राट महादेवराय यादव आणि सम्राट
रामचंद्रदेव यादव यांच्या काळातील महामंत्री उर्फ पंतप्रधान (१२६०-१३०९) असणार्या
हेमाडपंतांनी मोडी लिपी ही श्रीलंकेहून हिंदुस्थानात आणली. या हेमाडपंतांचे मूळ
नाव होते ‘हेमाद्री पंडित’. यांना ‘श्री करणाधिप’ अशी पदवी होती. काही इतिहासकार मानतात
की हेमाडपंतांनी मोडी श्रीलंकेतून आणली नसून त्यांनी स्वतः ती तयार केली आहे.
परंतू, हिंदुस्थानातील लिपीशास्त्र तज्ञांच्या मते हेमाडपंत
मोडीचे जनक नसून मोडीचे मूळ हे सम्राट अशोकाच्या काळातील राजलिपी असणार्या ‘ब्राह्मी लिपी’त दडलेले आहे. वस्तुतः यादव
साम्राज्यातील सापडलेल्या दस्तावेजांवरून हेमाडपंतांच्या काळी राज्यातील प्रशासकीय
व्यवहार हा मोडीतूनच चालत असे हे स्पष्ट झाले आहे. हेमाद्री हे यादवांच्या सुवर्णकाळात
महाराष्ट्राचे पंतप्रधान होते. यावेळेस यादव साम्राज्य हे गंगासागर, सिंधुसागर आणि हिंद महासागर अशा तिनही सागरांना जाऊन भिडले होते. जर
हेमाडपंतांनी मोडीचा वापर सुरू केला असे मानले तर मग, एवढ्या
कमी कालावधीत राज्याच्या कानाकोपर्यातील प्रशासकीय अधिकार्यांना मोडी शिकवली
कोणी वा कधी हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शिवाय,
लिपीशास्त्रकारांनी अशोकाच्या ‘ब्राह्मी लिपी’ आणि ‘मोडी लिपी’तील अनेक
गोष्टीतील साधर्म्य दाखवून दिल्याने मोडीला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे
या गोष्टीला दुजोरा मिळतो. अर्थात, असे असले तरीही, मोडीचा प्रचार आणि प्रसार हा मुख्यत्वेकरून हेमाद्री पंडितांनीच केल्या
ने त्याचे श्रेय केवळ त्यांनाच दिले पाहिजे. मोडीला ‘पिशाच्च
लिपी’ अथवा ‘पैशाची’ असेही म्हटले जात असे.
मोडी ही शिघ्र लिपी आहे. म्हणजे, ज्या
लिपीद्वारे वाक्य लिहीताना मध्ये ‘न मोडता’ येते ती ‘मोडी’. मोडीतील
बहुतांशी अक्षरे ही देवनागरी लिपीशी साधर्म्य दर्शवणारी आहेत. शिवाय मोडीत
प्रामुख्याने र्हस्व-दीर्घ असे प्रकार विचारात घेतले जात नसल्याने व्याकरणाच्या
चूका होण्याची अतिशय नगण्य असते. देवनागरी लिपीत लिहीताना प्रत्येक शब्द लिहीण्यासाठी
हात उचलावा लागतो. परंतू मोडी लिपीत, लिहीण्यासाठी प्रत्येक
वेळी हात उचलणे आवश्यक नसते. लिखाणाला सुरुवात करण्यापूर्वी,
कागदाच्या डावीकडून उजवीकडे एक रेघ आखून लिहीण्यास सुरुवात केली जाते. यामूळे, लिखाणासाठी लागणारा वेळही वाचतो. हा, आता
लिहीण्यासाठी देवनागरी प्रमाणे कोणतेही नियम नसल्याने लिहीलेले वाचण्यास थोडे
गुंतागुंतीचे वाटू शकते. परंतू, मोडी लिपीत वाक्य कोठे
तोडावे याला मात्र कसलेही बंधन नाही. ही लपेटीयुक्त अथवा
वळणदार लिखाणासाठी सर्वोत्तम अशी लिपी आहे. एकाच अक्षराला जोडून दुसरे अक्षर
लिहीण्याला लपेटीयुक्त लिखाण म्हटले जाते.
महाराष्ट्राच्या इतिहासात मोडीचे महत्व
अनन्य साधारण आहे. बहुतांशी ऐतिहासिक दस्तावेज हा मोडी लिपीतच आहे. मोडीचे
मुख्यत्वेकरून कालखंडानुसार चार प्रकार पडतात.
१) बहमनीकालीन, २) शिवकालीन, ३) पेशवेकालीन आणि ४) आंग्लकालीन.
साधारण सोळाव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंतचे लेखन हे ‘बहमनीकालीन मोडीत’ मोडते. सतराव्या शतकाच्या
मध्यापासून ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंतचे लेखन हे ‘शिवकालीन
मोडी’त आहे. अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते एकोणीसाव्या
शतकात पेशवाई संपेपर्यंतचे बहुतांशी लिखाण हे ‘पेशवेकालीन
मोडी’त गणले जाते तर त्यानंतरचे लिखाण हे ‘आंग्लकालीन’ आहे. या मोडीच्याही ‘चिटणीशी’, ‘फडणीशी’ अशा अनेक शैल्या होत्या. बहमनीकालीन मोडी ही वाचण्यास अत्यंत क्लिष्ट
आहे. त्यानंतर शिवकालीन मोडी ही त्यामानाने सुटसुटीत असली तरी वाचण्यास तितकीशी
सोप्पी वाटत नाही. पेशवेकालीन मोडी ही अत्यंत वळणदार आणि सुवाच्य असे तर पुन्हा
आंग्लकाळातील मोडी लेखन हे बारीक टाक अथवा पेन च्या सहाय्याने लिहील्याने वाचण्यास
अत्यंत कठीण जाते.
साधारण १९५० च्या दशकात महाराष्ट्र
सरकारने मोडी लिपीचा वापर अधिकृतरीत्या कायमचा बंद केला. सरकारी राजाश्रय बंद
झाल्याने मोडीचे पुढील पिढ्यांना मिळणारे शिक्षणही बंद झाले. पुढे साधारणतः ४
दशकांनंतर काही हौशी इतिहासकार आणि मोडीविषयी कळकळ असणार्या लोकांनी एकत्र येऊन
पुन्हा मोडीचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राचा मध्ययुगीन
इतिहास हा मोडीतच अडकला आहे. परंतू ऐतिहासिक दस्तावेजांचा आवाका पाहता आज संपूर्ण
महाराष्ट्रातील मोडी तज्ञांना एकत्र येऊनही केवळ मराठ्यांच्या संबंधीत दस्तावेजाचे
लिप्यंतर करायला किमान काही हजार वर्षे लागतील. आजघडीला पुणे पुराभिलेखागारात
सुमारे ४ कोटी कागद वाचकांची प्रतिक्षा करत धूळ खात पडून आहेत. याशिवाय मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद औरंगाबाद येथील पुराभिलेखागार, धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ आणि श्री समर्थ
वाग्देवता मंडळ, पुण्याचे डेक्कन कॉलेज आणि भारत इतिहास
संशोधक मंडळ, औंधचे भवानी संग्रहालय संग्रहालय इत्यादी अनेक
संस्थांमध्ये कोट्यावधी मोडी लिपीतील कागद जाणकारांच्या प्रतिक्षेत आहेत. परंतू, आपल्याकडे एकूणच, इतिहास आणि मोडी लिपी
यांच्याबद्दल उदासिनता असल्याने हे कागद किडे-मुंग्या आणि वाळवीचे भक्ष बनत आहेत.
उंदीर-घुशींच्या कित्येक पिढ्या त्यावरच जगतायत् म्हणे हल्ली !
महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक ठेवा आपण
प्राणपणाने जपला पाहीजे. नुसताच जपून उपयोग नाही, तर मोडी लिपीचे शास्त्रशुद्ध
शिक्षण घेऊन हा सारा इतिहास वाचला पाहीजे, इतिहासाची ही
महाद्वारं सर्वसामान्य लोकांसाठी खुली करून दिली पाहिजेत. अन् केवळयाच उद्देशाने, “जागतीक मोडी लिपी प्रसार समिती”ची स्थापना करण्यात आली आहे. मोडी लिपीचे
पुनरुज्जिवन व्हावे, तिचा जास्तितजास्त प्रसार व्हावा आणि
लोकांच्या मनात मोडी लिपीची गोडी निर्माण व्हावी हाच या समितीच्या स्थापनेमागचा
हेतू आहे. समितीमार्फत या वर्षापासूनच मुंबईत मोडी प्रशिक्षण वर्गाची सुरुवात झाली
आहे. या प्रशिक्षण वर्गानंतर ‘मोडी लिपी’ चे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. येत्या अल्पावधीतच, महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचा
समितीचा मानस आहे. शिवाय, मोडी जाणकारांसाठी विविध
विषयांवरील माहितीपर लेख, कवीता, ललित
कथा आणि इतरही अनेक गोष्टींचा अंतर्भाव असणारे एक ‘त्रैमासिक’ लवकरच प्रकाशित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींनी आणि
सर्वांनीच, या संधीचा लाभ घेऊन मोडीलिपीचे शिक्षण-प्रसार
करून समितीच्या या महत्कार्याला हातभार लावावा आणि आपल्या या सांस्कृतीक आणि
ऐतिहासिक ठेव्याची जपणूक करावी ही विनंती आहे. बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असू द्यावे... ॥ लेखनसीमा ॥