श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे जंजिरा मोहीमेतील पत्र

इ. स. १७३३ च्या मध्यावर श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी कोकणात जंजीरेकर सिद्दी सात वर स्वारी केली. या स्वारीदरम्यानच्या सिद्दीच्या आणि स्वतः पेशव्यांच्या हालचाली सांगणारे बाजीरावांनी दि. २४ मे १७३३ रोजी अंबाजीपंत पुरंदरे यांना लिहीलेले पत्र.

॥ श्री ॥


                                  राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री
                          अंबाजीपंत स्वामी गोसावी यांसी

     सेवक बाजीराव साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशळ तागाईत ज्येष्ठ कृष्ण सप्तमी गुरुवार पर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहीणे. विशेष तुमची दोन तीन पत्रे व बाळाचे पत्र व राजश्री स्वामींची पत्रे ऐशी काही काल  परवा पावली. त्यांत सारांश  की, "छावणी केली उत्तम केले खर्चास व लोक राजश्री स्वामी पुरवितात. प्रतिनिधीस व सरलष्कर कृष्णाजी दाभाडे रवाना केले. महाडास येतील. उदाजी चव्हाणाकडील कारकुनास सांगोन दोन हजार प्यादे आणविले आहेत ते ही येतील. संभुसिंग चव्हाण यांसही बोलविले आहे. तेही अलियावर रवाना होतील. सचिवासही निरोप दिल्हा" म्हणून सविस्तर लिहील्याप्रमाणे कळले. परंतू येथील मनसबा ऐसा आहे. शेखजी आम्हांस  भेटले. खोकरीची वाट मात्र त्यांणी दाखवून दिल्ही. काम करीता इतकेच केले. येथे येताच दुसरे दिवशी त्यांस बोलावून हत्ती, वस्त्रे देत होतो. खर्चाची रदबदल करू लागले. तेव्हा बोली करून तूर्त दाहा हजार रुपये त्याचे पदरी घातले. बहुमानासाठी बहुतसा आग्रह केला. परंतू ते करून घेईनात. लोक कोणी त्याजजवळ राहीले नाहीत. सारे उठउठोन आपापले कबिले काढावयास गेले. तेव्हा गड सुटले नव्हते. आता गड सुटले. सारे कबिले मुलखातच मागती राहीले. लोकांस मागती बोलावू पाठविले आहे. येतील तेव्हा खरे. पहिले लोक कोणी शे-दोनशे भेटले त्यांस अटक करून ठेवावे तरी कौल दिल्हा. कार्य होते कौलाचेच होते. यास्तव त्यांस अटकही करीता नये. यास्तव निरोप दिल्हा. आतील राजकारण होते ते तो पहिलेच दिवशी वारले. आतां प्रस्तुत काही शेखजीच्याने कार्य होत नाही. बरेही वाटत नाही. चार महिने येथे राहिल्याउपरी मग त्यांच्याने तरतूद होईल ते करतील. खर्चास मागतील तसे देणे लागेल. गड घेतले त्यापैकी अवचितगड त्याचे हवाली कबिले ठेवावयास करावा असे झाले. तोही त्याचे हवाली केला. न करावा तरी बेदिल होतो. करावा तरी इतबारही पुरेना. परंतू करणे प्राप्त झाला. केला. या जातीचे त्याचे वर्तमान आहे. खानजादा थोरला मेला. त्याचा लेक बाहेर होता तो आम्हांजवळ आहे. आणि लहान भाऊ त्याचे साहाजण आहेत. हाही मूल शाहाणाच आहे. आत सिद्दीसमूलसिद्दीअंबर अफलानी ऐसे आहेत. बाराशे माणूस किलियावर आहे. पहिले थोडकेच होते. आलिकडे अंजनवेली व उंदेरीहून मदत त्यास आली. एकूण भरती झाली आहे. अंजनवेलही मजबूतच आहे. उंदेरीही मजबूतच आहे. चारी जंजिरे त्याचे बरे खबरदार, मुसलमानाच आहेत. अंजनवेलीस काही मराठे असतील त्यांकडे विजयगड, गोवळचा कोट दोन आहेतच. तिसरा मंडणगडही त्याने बळाविला आहे. रायगडावर तीन-चारशे माणूस मुसलमान आहेत. चार पाचशे मराठे आहेत. गड न बळाविला (?) आहे.  जुंजतात. काही पैगामही वरील लागला म्हणून गेले आहेत. ते लिहीतात तथ्यामिथ्या तहकीक तह किंवा नाही. कळले नाही. वर्तमान येईल ते लिहून पाठवू. ऐसे वर्तमान आहे. सविस्तर कळावे म्हणून लिहीले असे, लोभ असो दीजे हे विनंती. छ २२ जिल्हेज शनवार.या पत्रात सुरुवातीला काही व्यक्तिंची नावे आली आहेत. यांमध्ये-
- अंबाजीपंत स्वामी म्हणजे अंबाजीपंत त्र्यंबकपंत पुरंदरे. अंबाजीपंत हे पेशव्यांचे मुतालिक होते. बाळाजी विश्वनाथांच्या समकालीन असणारे आणि बाळाजीपंतांचे सुरुवातीपासूनचे स्नेही असणार्‍या अंबाजीपंतांना बाळाजींच्या मृत्यूनंतर बाजीराव
आणि चिमाजीअप्पा वडिलांसमान मान देत.
- बाळाचे पत्र म्हणजे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांचे पत्र.
- राजश्री स्वामी  म्हणजे छत्रपती शाहू महाराज.
- प्रतिनिधी  म्हणजे श्रीनिवास परशुराम उर्फ श्रीपतराव पंतप्रतिनिधी. परशुराम पंतप्रतिनिधींचा पुत्र.
- सरलष्कर म्हणजे त्र्यंबकराव दाभाड्यांच्या मृत्यूनंतर कृष्णाजी दाभाडे हे सरलष्कर झाले.
- उदाजी आणि शंभूसिंग चव्हाण हे पूर्वी ताराबाईंकडे होते, नंतर ते शाहूराजांच्या पक्षात आले. या चव्हाण घराण्याला राजाराम महाराजांकडून 'हिम्मतबहाद्दर' हा किताब मिळाला होता.
- शेखजी ही व्यक्ति म्हणजे बाजीराव पेशव्यांनी जंजिर्‍याकरीता केलेला फितूर होता. या शेखजीची माणसे जंजिर्‍यात राहून आतल्या बातम्या पुरवत  असत, परंतू आतले राजकारण पहिल्याच दिवशी सिद्दीला समजले आणि त्याने आतल्या फितूरांना मारून टाकले असं बाजीराव म्हणतात. बाजीरावांनी या शेखजीला १०००० रु दिले आणि बहुमानासाठी बहुतसा आग्रह केला म्हणजे शाहूराजांकडे चाकरी करण्यासाठी आग्रह केला पण त्याने तो मानला नाही. शेखजीच्या आणि त्याच्या माणसांच्या कबिल्याच्या सुरक्षिततेसाठी बाजीरावांनी  अवचितगड त्याच्या हवाली केला होता. येथेही बाजीराव म्हणतात की किल्ला दिला नाही तर तो खट्टू होतो आणि देण्यासाठी पूरता विश्वासही येत नाही, पण अखेर बाजीरावांनी किल्ला दिला. जंजिर्‍याच्या सिद्दीसातचा थोरला मुलगा मारला गेला असून किल्ल्यात सिद्दी सात सह सिद्दी संबूळ आणि सिद्दी अंबर अफलानी हे अधिकारी आहेत. सिद्दीसातचा नातू बाहेर बाजीरावांना सामिल झाला होता. अंजनवेल आणि उंदेरीहून सिद्दीसातला मदत मिळत असे हे या पत्रात स्पष्ट दिसून येते. रायगडावरही फितूरीसाठी माणसे पाठवली असून किल्लेदाराच्या मनात पेशव्यांशी तह करण्याविषयी अजून काही नाही असं बाजीराव लिहीतात..
एकूणच, या पत्रातून या जंजिरा मोहीमेची किती जय्यत तयारी बाजीरावांनी केली होती हे स्पष्ट समजून येते.

संदर्भ : लेखांक ३२, काव्येतिहास संग्रह : ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे (संपादक : सरदेसाई, काळे, वाकस्कर)
© कौस्तुभ कस्तुरे     ।    kasturekaustubhs@gmail.com