श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवेश्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे


बाळाजी विश्वनाथ हे श्रीवर्धनकर चित्पावन भट घराण्यातील पहिले पेशवे. उपलब्ध माहिती आणि काही त्रोटक उल्लेखांवरून यांचा जन्म १६६० च्या आसपास झाला असावा. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणार्‍या श्रीवर्धन या गावच्या या भट घराण्याकडे पिढीजात श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या गावांची देशमुखी होती. महादजी विसाजी भट यांच्यापासून भट घराण्याची माहिती मिळते. पेशव्यांच्या एका हकीकतीमध्ये महादजी विसाजींचे पुत्र परशुराम महादजी आणि नातू विश्वनाथ उर्फ विसाजी परशुराम हे शिवाजी महाराजांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख आढळतो
- "वाका श्रीमंत कैलासवासी सिवाजी छत्रपती माहाराज त्यांचे जवल श्रीमंत कैलासवासी परशरामपंत उपनाव भट कसबे श्रीवर्धन तो॥ म॥र प्रां॥ (तालुके मजकूर प्रांत) दंडाराजपुरी येथील देशमुख हे चाकरीस राहीले. तो प्रकार सदरी लिहीला आहे. त्यांचे चिरंजीव कैलासवासी विसाजीपंत यांस दोन हजारी फौजेची सरदारी सांगितली". या विश्वनाथ परशुरामांना कृष्णाजी रुद्राजी जानोजी बाळाजी आणि विठ्ठल असे पाच पुत्र होते. त्यापैकीच बाळाजी विश्वनाथ हे पुढे आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या पेशवेपदी विराजमान झाले.

राजाराम महाराजांच्या काळात कोकणात आंग्र्यांची सत्ता उदयाला येत होती आणि श्रीवर्धनचे हे देशमुख आंग्र्यांना सामिल आहेत असा जंजिरेकर सिद्दींना संशय होता. अशातच एका वर्षी मीठाचे उत्पन्न कमी झाल्याने जंजिरेकरांना ठरलेल्या जकातीचा भरणा करणे बाळाजीपंतांना शक्य झाले नाही. या जकातीच्या पुर्ततेसाठी बाळाजीपंतांचे स्नेही संभाजीपंत मोकाशी जामिन राहीले. अखेरीस बाळाजीपंत ही देशमुखी सोडून जाण्याच्या विचारात असतानाच सिद्दींनी जामिन राहिलेल्या संभाजीपंतांना जंजिर्‍यावरून पोत्यात बांधून समुद्रात फेकून दिले. हबशांच्या या कारस्थानांमूळे बाळाजीपंतांना श्रीवर्धन सोडून जाणे भाग पडले. बाळाजीपंत गेले ते थेट चिपळूणला ! येथेच त्यांची प्रथम ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांशी भेट झाली असावी आणि स्वामींनीच त्यांना देशावर जाण्याचा सल्ला दिला असावा. यानंतर काही बखरी आणि हकीकतींतील त्रोटक उल्लेखांनुसार बाळाजीपंत वेळासला येऊन आपले तीन आत्तेबंधू हरी महादेव, बाळजी महादेव आणि रामाजी महादेव भानू यांच्यासोबत देशावर आले. मध्ये जंजिरेकरांच्या हुकूमावरून अंजनवेलच्या किल्लेदारानी या बाळाजींना पकडून कैदेत डांबले पण भानू बंधूंनी त्यांची सुटका करून मग ते चौघेही सासवडला अंबाजीपंत पुरंदरे यांच्याकडे येऊन पोहोचले. पुरंदरे हे स्वराज्यातील एक मातबर घराणे असल्याने बाळाजीपंतांना प्रथा शंकराजी नारायण सचिवांकडे आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे मुतालकी केली. पुढे पुढे बाळाजीपंतांची पत वाढत जाऊन आपल्या हुशारीने ते १६९९ ते १७०३ दरम्यान पुणे प्रांताचे सरसुभेदार झाले.

१६९५ ते १६९९ दरम्यान औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या दक्षिण तीरावर ब्रह्मपुरी येथे असताना बाळाजींचा वावर असावा, आणि याच काळात त्यांनी प्रथम लहानग्या शाहूंना पाहिले असावे. १७०३ मध्ये औरंगजेबाचा सिंहगडाला वेढा पडला असताना किल्ल्यातून बाहेर आलेल्या गृहस्थांत "बालू पंदत" म्हणजे बाळाजीपंत आहेत. यावेळेस त्यांचा उल्लेख मराठी कागदांत 'दिम्मत सेनापती' आढळतो म्हणजे ते धनाजी जाधवरावांच्या पदरी होते. पुढे १७०३ ते १७०७ बाळाजीपंत दौलताबादचे सरसुभेदार होते.. या सार्‍या काळात बाळाजीपंतांच्या कामगिरीमूळे त्यांचे मराठमंडळाच्या निरनिराळ्या सरदारांशी नाते जुळले. मे १७०७ मध्ये शाहूंच्या सुटकेनंतर ताराबाईंनी शाहूंना राज्याधिकार नाकारला असताना बाळाजीपंतांनी शाहूंना ओळखले आणि धनाजी जाधवरावांनाही शाहूराजांची ओळख पटवून दिली आणि ताराबाईंचा विरोध पत्करून शाहूराजांना सातार्‍याच्या गादीवर बसवले. पुढे धनाजीरावांच्या मृत्युनंतर त्यांचा पुत्र चंद्रसेन जाधवाच्या उपद्व्यापी धोरणांमूळे शाहू महाराजांनी बाळाजींना १७११ मध्ये होनाजी अनंतांकडे असलेले "सेनाकर्ते" हे पद आणि २५१०२०० रुपयांचा सरंजाम बहाल केला आणि बाळाजींनीही हे पद सार्थ करून दाखवले.

१७१३ मध्ये शाहू महाराजांनी मोगलाईतून चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा हे हक्क वसूल करण्यासाठी बाळाजीपंत आणि चंद्रसेन जाधव या दोघांना पाठवले असता दोघांच्यात तंटा उत्पन्न होऊन चंद्रसेन जाधवाने बाळाजींना पांडवगडाजवळ अडवून धरले. याप्रसंगी बाळाजींचे स्नेही पिलाजी जाधवराव वाघोलीकर यांनी बाळाजीपंतांची सुटका केली. पुढे सरदार निंबाळकरांना शाहू महाराजांनी नगरहून बोलावून घेतले आणि जाधवांचा पुर्ण पराभव होऊन ते ताराबाईच्या पक्षाला उघड उघड जाऊ मिळाले. याच सुमारास कोकणात ताराबाईंमार्फत कान्होजी आंग्रे हे शाहूंच्या विरोधात उतरले आणि त्यांनी पेशव्यांचे राजमाची-लोहगड-विसापूर इत्यादी किल्ले काबिज केले. महाराजांनी आंग्र्यांच्या बंदोबस्तासाठी पेशवे बहिरोपंत पिंगळ्यांना पाठवले असतानाच कान्होजींनी पेशव्यांना अटक केले. अखेरीस शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाळाजीपंतांनी कान्होजी आंग्र्यांशी बोलणी करून त्यांच्याकडून बहिरोपंतांची सुटका केलीच, पण किल्लेही परत मिळवले आणि मुख्य म्हणजे कान्होजींसारखा दर्याबहाद्दर ताराबाईंचा पक्ष सोडून कायमचा शाहू महाराजांना सामिल झाला. या मोहीमेपूर्वीच शाहूराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद बहाल केले होते. खुद्द बहिरोपंत कैद झाल्याने शाहू महाराजांना पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न पडला असताना अंबाजीपंत पुरंदर्‍यांनी बाळाजीपंतांचे नाव सुचवले. शंकराजीपंतांनीही "बाळाजीपंत भट यांजकडे फौजेचे वळण आहे, पेशवाई त्यांस द्यावी" असा पुरंदर्‍यांना दुजोरा दिला. आणि दि. १७ नोव्हेंबर १७१३, पुण्याजवळील मांजरी या गावी बाळाजीपंतांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. यासोबतच बाळाजीपंतांनी आपल्या आत्तेबंधूंचे आणि अंबाजीपंतांचे उपकार लक्षात घेऊन भानू बंधूंना "फडनिशी" आणि पुरंदर्‍यांना "मुतालकी" बहाल केली. यानंतर २८ फेब्रुवारी १७१४ मध्ये आंग्रे आणि पेशवे यांच्यामध्ये सलोखा होऊन आंग्रे स्वराज्यात आले. १७१६ च्या प्रारंभी दमाजी थोरात हिंगणगावकर याने शाहू महाराजांविरुद्ध दंगा मांडल्याने पेशव्यांना रवाना केले. बाळाजीपंत दमाजीला भेटायला गेले असता दम्माजीने 'फितूर दगाबाजी करून' बाळाजीपंतांना परिवारासह अटक केले आणि पैसा-खंडणी द्यावी म्हणून राखेचे तोबरे भरून मांस काढेपर्यंत हाल केले. यानंतर खंडणी ठरवून म्हणून अंबाजीपंत आणि पिलाजी जाधवराव बाहेर पडून खंडणीची तरतूद करून सर्वजण सुटले. यावेळेस कान्होजी आंग्रे कोकणात असल्याने आणि कोल्हापूरकरांनी शाहूंकडील सरदार फोडल्याने अपुर्‍या सैन्यबळामूळे दमाजीवर मोहीमकरता आली नाही. पण काही महिन्यातच १७१७-१८ च्या दरम्यान बाळाजीपंतांनी हुसेनअली सय्यदाच्या मदतीने थोराताचा संपूर्ण पराभव करून हिंगणगावची गढी जमिनदोस्त केली. १७१८ पर्यंत बाळाजींचा मुक्काम सासवडला पुरंदर्‍यांच्याच वाड्यात होता.पुढे काही काळ ते सुप्याला राहिले.या काळात सावडच्या नव्या वाड्याचे काम सुरु होते. पुन्हा २३ मे१७१९ रोजी पेशवे सासवडच्या नव्या वाड्यात रहायला आले. सेनापती चंद्रसेन जाधवाच्या नंतर बाळाजीपंतांच्या विनंतीवरून खंडेराव दाभाड्यांना 'सेनापती'पद बहाल करण्यात आले.

१७१९ मध्ये सय्यदबंधूंनी दिलीच्या फर्रुखसियर बादशहाला पदावरून काढून 'रफिउद्दौरजत' याला नवा बादशहा केले. त्यामूळे बादशहा सय्यदबंधूंच्या ताब्यात आला. इकडे निजाम चिनक्क्लिचखान उर्फ मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा प्रचंड जळफळाट झाला. त्यामूळे सय्यदबंधूंनाही बाळाजींची आवश्यकता वाटू लागली. याचाच उपयोग करून बाळाजीपंतांनी नवे राजकारण केले आणि मराठी राज्यासाठी या संधीचा पुरेपुर फायदा उठवला. याचा परिणाम म्हणजे ३ मार्च आणि १५ मार्च १७१९ रोजी चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकृत सनदा पेशव्यांनी बादशहाकरवी मंजूर करून घेतल्या. आता कोणताही मोंगल सुभेदर खंडणी द्यायला नकार देणार नव्हता. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे राजमाता येसुबाई, शाहूराजांचा सावत्र बंधू मदनसिंह आणि इतर राजपरिवाराची सुटका झाली. सय्यदबंधूंच्या विरोधकांनी बाळाजीपंतांचा काटा काढण्याचे ठरवले, पण नेमक्या ऐनवेळेस बाळाजीपंतांच्या पालखीत बाळाजी महादेव भानू (नाना फडणीसांचे आजोबा) असल्याने ते ठार झाले. बाळाजीपंत राजपरिवारासह मोठ्या धावपळीने ४ जुलै १७१९ रोजी सातार्‍याला पोहोचले. १७१९ च्या पावसाळ्यानंतर कोल्हापूरकर संभाजीच्या कारवायांना रोखण्यासाठी बाळाजीपंत बेळगाव-डिग्रज या भागत गेले आणि मार्च १७२० मध्ये कोल्हापूरकरांवर निर्णायक विजय मिळवून पंत पुन्हा सासवडला परतले. यानंतर आठवड्याच्या आतच दि. २ एप्रिल १७२० रोजी शनिवारी बाळाजीपंतांचा मृत्यु झाला.

औरंगजेबाच्या मृत्युनंतर मराठमंडळामध्ये एकजूट नव्हती. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली छापेबाजी सुरु होती, मात्र त्या लढ्यात सुसुत्रता नव्हती. बाळाजी विश्वनाथांनी मराठमंडळाची एकजूट करून लढा मांडला आणि पुन्हा २० वर्षांच्या आतच बाळाजीपंतांच्या पराक्रमी पुत्राने, थोरल्या बाजीरावसाहेबांनी थेट दिल्लीवरच धडक मारून सबंध हिंदुस्थानातील सत्ताधिशांना दाखवून दिले. आम्ही मराठे अजून जिवंतच नाही तर राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्स पक्षासारखे महत्वाकांक्षी आहोत !!

स्वराज्याचा पाया बळकट करणार्‍या या पेशव्याला साष्टांग दंडवत.. मुजरा ! मुजरा !!


संदर्भ -
१) पेशवे घराण्याची यादी
२) पेशवे शकावली
३) पेशव्यांची हकीकत
४) बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची बखर
५) सरदार पुरंदरे यादी
६) मराठी रियासत (शाहू कालखंड)
७) काव्येतिहास संग्रहातील पत्रे
८) पुणे दरबारचा फार्सी पत्रव्यवहार (पुराभिलेखागार प्रकाशित)
९) साधनपरिचय

© सदर लेखाचे हक्क राखिव असून कोणीही स्वतःचा म्हणून प्रकाशित करू नये.
Kaustubh Kasture