श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, अपराजित योद्धा !!

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहूमहाराजांसमोर पेच पडला की पेशवेपद कोणाला द्यावे. अनेकांनी सल्ला दिला की “बाजीरावसाहेब बहुत उद्दाम प्रकृतीचे, अवघा वेळ शिपाईगीरीत मग्न, राज्यकारभार चालवावयास सबुरी असावी तो भाव नव्हता. यामूळे या पदाचे उपयोगी नाहीत”. यावर सगळ्यांचे ऐकून शाहूराजे म्हणाले, “बाळाजी विश्वनाथ यांनी या राज्यात जिवादारभ्य श्रमसाहस करून पुढे सुख भोगिले नाही. याजकरीता यास वस्त्रे तूर्त देतो. यांचे दैवी असल्यास श्रीशंभू कृपा करील. उपयोगी नाही असे दिसल्यास पुढे विचार होईल”..
असं म्हणून बाजीरावांना १७ एप्रिल १७२० रोजी कराडनजिक मसुरच्या मुक्कामी पेशवाईची वस्त्रे मिळाली. यानंतर मात्र बाजीरावांनी क्षणाचीही उसंत न घेता पुढील अवघी वीस वर्षे आपले जीवन स्वराज्यकार्यात झोकून दिले आणि शाहूराजांना “पुढे विचार करण्याची” गरजच भासली नाही. 

बाजीरावसाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या मोहिमा / घटना पुढीलप्रमाणे-


१) सप्टेंबर १७२० मध्ये बारामातीला वेढा घालून कोट जिंकला आणि मोंगल सुभेदाराला हाकलले.

२) ४ जानेवारी १७२१ रोजी निजाम मीर कमरुद्दीन सिद्दीकीची चाळीसगावच्या जवळ चिखलठाण येथे यशस्वी भेट.

३) डिसेंबर १७२२ मध्ये बाजीराव माळव्याच्या प्राप्तीकरीता उत्तरेत

४) १३ फेब्रुवारी १७२३ रोजी माळव्यात बदकशा येथे निजामाची दिल्लीच्या बादशहाविरुद्ध यशस्वी भेट.

५) १४ मार्च १७२३, खानदेशात लांबकानी येथे निजामाच्या फौजांशी युद्ध करून बाजीराव माळव्यात गेले.

६) १८ मे १७२४ रोजी नालछा येथे निजामाची यशस्वी भेट.

७) १० जानेवारी १७२४, बाजीराव-पोर्तुगिज तह झाला. 

८) ३० सप्टेंबर १७२४ रोजी साखरखेर्ड्याला निजामाला सहाय्य करत बाजीरावांनी मराठ्यांचा कट्टर शत्रू मुबारीजखानाला मारले. निजामाने या गावाचे नाव फत्तेखेर्डा ठेवले. या लढाईत बाजीरावांच्या कर्तृत्वाने अचंबित होऊन निजामाने त्यांच्यावर अनेक मौल्यवान वस्तु, हत्ती, सप्तहजारी मनसब इत्यादी देऊ केली.

९) नोव्हेंबर १७२५ ते मे १७२६ चित्रदुर्गची यशस्वी स्वारी.

१०) नोव्हेंबर १७२६ ते एप्रिल १७२७ श्रीरंगपट्टणची यशस्वी स्वारी.

११) १७२७ च्या पावसाळ्यात निजामाने पुण्यावर हल्ला केला. अप्पा शाहूंना घेऊन पुरंदरावर गेले. पेशवे पुण्यावर येत आहेत हे पाहताच निजाम पळू लागला. इकडे बाजीरावांनी निजमाचे जालना आणि सिंदखेड परगणे बेचिराख केल्याने तो चवताळला आणि अखेरीस पालखेडला पेशव्यांच्या कचाट्यात सापडला.

१२) २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडला युद्ध होऊन निजामाचा दारुण पराभव झाला. 

१३) ६ मार्च १७२८ रोजी निजामाने पेशव्यांशी स्वतःला अपमानकारक मुंगी-शेगावचा तह केला.

१४) २९ नोव्हेंबर १७२८ रोजी राजपुतान्यात आमझेरा इथे अप्पासाहेबांनी मोंगल सुभेदार दयाबहाद्दूर आणि गिरिधरबहाद्दूर यांना गारद करून अपूर्व विजय मिळवला.

१५) १३ डिसेंबर १७२८रोजी उज्जैन जिंकली. 

१६) २८ एप्रिल १७२९ रोजी जैतपृरच्या लढाईत बाजीरावांनी मोंगल सेनापती महंमदखान बंगशाचा पराभव केला.

१७) फेब्रुवारी १७३०मध्ये चिमाजीअप्पा आणि उदाजी पवारांनी गुजरातेत पावागड काबिज केला.

१८) २३ मार्च १७३०, पेशव्यांच्या चढ्या धोरणामूळे गुजरातच्या मोंगल सुभेदाराने हाय खाऊन गुजरातचे ४४ महाल पेशव्यांना दिले.

१९) १ एप्रिल १७३१ रोजी फितुर होऊन निजामाला सामिल झालेल्या सेनापती त्र्यंबकराव दाभाड्यांचा बाजीरावांनी डभईच्या लढाईत दारुण पराभव केला. दाभाडे मारले गेले. 

२०) ८ मार्च १७३१, बाजीरावांनी सुरतेजवळ निजामाचा पराभव केला.

२१) १० फेब्रुवारी १७३२, बाजीराव-पोर्तुगिज तह झाला. 

२२) १२ फेब्रुवारी १७३२, कुलाब्यास सेखोजी आंग्रे-बाजीराव भेट होऊन जंजिरा मोहीमेला सुरुवात.

२३) एप्रिल १७३२, जंजिर्‍याला वेढा पडला.

२४) मे १७३२ मध्ये पेशव्यांनी राजकारण करून रायगड घेतला.

२५) २७ डिसेंबर १७३२ रोजी रुई-रामेश्वर येथे मांजरा नदीकाठी निजामाची यशस्वी भेट. 

२६) १० जानेवारी १७३४, सिद्दी अंबर अफबानीचा रायगडाखालीपराभव होऊन मृत्यू.

२७) ८ मार्च १७३४, बाजीरावांनी आंग्र्‍यांच्या मदतीने बाणकोट जिंकले. 

२८) १३ फेब्रुवारी १७३५, पेशव्यांचे सरदार शिंदे-होळकरांकडून रामपुराजवळ मोंगलांचा पराभव.

२९) ३ ते ७ फेब्रुवारी १७३६, उदेपुरचा राणा जगतसिंह याने बाजीरावांचा सन्मान करून चक्क महाराणा प्रतापाच्या सिंहासनावर बसण्याची विनंती केली.

३०) १५ फेब्रुवारी ते ८मार्च, जयपुरच्या सवाई जयसिंगाशी पेशव्यांच्या वाटाघाटी. जयसिंगाने बादशहाच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला पण बादशहाने बाजीरावांना घाबरून प्रत्यक्ष भेटीचा प्रस्ताव नाकारला.

३१) १९ एप्रिल १७३६, चिमाजीअप्पांची मोहीम. रेवसच्या लढाईत सिद्दीसात मारला गेला. 

३२) मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्‍या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्‍या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली.

३३) या दिल्लीस्वारीत भेलसा, भोपाळ, चंदेरी, विदिशा, नरवर, दतिया, जाठवाडा, भदावर, अटेर, अंतर्वेद अशा अनेक अनेक लढाया झाल्या आणि त्या सगळ्या बाजीरावांनी जिंकल्या. 

३४) २७ मार्च १७३७, चिमाजीअप्पांनी ठाणे जिंकले.

३५) १६ डिसेंबर १७३७ रोजी भोपाळवर निजामाचा दारुण पराभव. याच सुमारास निजामपुत्र नासिरजंगाचा चिमाजीअप्पांनी नर्मदेच्या दक्षिण तीरावर पराभव केला. 

३६) ७ जानेवारी १७३८, निजाम-पेशवे यांच्यात सराई-दुराईचा तह.

३७) ६ फेब्रुवारी १७३८, मोंगलांचा कोय परगणा पेशव्यांनी लुटला. 

३८) ९ जानेवारी १७३९, अप्पांनी माहिम जिंकली. 

३९) १२ जानेवारी १७३९ रोजी पेशव्यांचे सरदार आणि व्याही व्यंकटराव घोरपडे यांनी मडगाव जिंकले. आणि २७ एप्रिल रोजी पोर्तुगिजांशी तह केला. 

४०) १२ मे १७३९रोजी अप्पांनी वसई जिंकली. 

४१) २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंगाचा औरंगाबादजवळ बाजीरावांनी दारुण पराभव केला. 

४२) ७ सप्टेंबर १७४० रोजी इंग्रज-बाजीराव तह झाला. याचवेळेस चौलचे ठाणे पेशव्यांनी जिंकले.

या सगळ्या लढायांपैकी एकही लढाई न हारणारा हा जगातील एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्या योद्ध्यातील एक अद्वितिय अपराजित योद्धा आहे. अखेर दि. २८ एप्रिल १७४० रोजी नादिरशहाच्या आक्रमणाला तोंड देण्यास जात असताना नर्मदेच्या काठी रावेरखेडी येथे या महान पेशव्याचा मृत्यू झाला. मराठी दौलतीचे सुवर्णपान गळाले. 


पेशवे दफ्तर खंड १० मधील एका पत्रात म्हटलंय, “तिर्थरुप रायांचा पुण्यप्रताप विचित्र. तत्प्रभावेकरून मोठी अवघड कामे स्वल्पायासे होतात. आज दक्षिनेत मोहरा एकच आहे. यासमयात पंतप्रधान हे महाराजांचा एक डोळा आहेत. जे कोणी देखो शकत नाहीत तेच हीनप्राक्तनी, करंटे ! राजश्रीची चाकरी एकनिष्ठे मनोभावे करीतात. म्हणोन श्रीने भाग्य-उत्कर्ष दिल्हे आणि जयही आहे”.. दिल्लीस्वारीतील आणखी एका पत्रात म्हटलंय, “रायांचे पुण्यप्रताप ऐसे जाहले की आज हस्तिनापुरचे राज्य घेऊन स्वामिंस देतील तरी समय अनुकूळ आहे”. 


अशा या महान पेशव्यांच्या स्मृतींस अभिवादन करून त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याला “साम्राज्याचे” मूर्त रुप देणार्‍या या महान पंतप्रधानाला त्रिवार मुजरा !! 
- कौस्तुभ कस्तुरे
© लेखाचे हक्क राखिव असून मूळ लेख www.kaustubhkasture.in या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे.