श्रीसमर्थ रामदासस्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली चाफळची सनद.

श्री समर्थ रामदास स्वामींना तर महाराज गुरूस्थानीच मानायचे. समर्थांना महाराजांनी लिहीलेले हे पुढील पत्र वाचल्यावर आपल्याला हे स्पष्ट समजूनच येते..


“श्रीसद्‍गुरूवर्य श्रीसकळतिर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमाहाराज श्रीस्वामी स्वामीचे सेवेसी- 

चरणरज सिवाजी राजे याणी चरणावर मस्तक ठेऊन विज्ञापना जे, मजवर कृपा करुनु सनाथ केले, आज्ञा केली की, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु, धर्मस्थापना, देव-ब्राह्मणाची सेवा, प्रज्येची पीडा दूर करुन पाळणरक्षण करावे, हे वृत संपादून त्यात परमार्थ करावा. तुम्ही जे मनीं धराल ते श्री रघुनाथ सिधीस पावविल. त्याजवरून जो जो उद्योग केला, व दुष्ट तुरुख लोकांचा नाष करावा, विपूळ द्रव्ये करूनु राज्यपरंपरा आक्षई चालेल यैसी स्थळें दुर्घट करावीं, यैसे जें जें मनीं धरीलें तें तें स्वामिनी आसिर्वादप्रतापे मनोरथ पूर्ण कळे. याऊपरी राज्य सर्व संपादीले, तें चरणीं आर्पण करुनू सर्वकाळ सेवा घडावी यैसा विचार मनीं आणिला. तेव्हां आज्ञा झाली की, तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले, तेच करावे, तीच सेवा होय, यैसे आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावे, श्री रघुनाथाची स्थापना कोठेतरी होऊनु सांप्रदाय, सिष्य व भक्ति दिगंत विस्तिर्ण घडावी, यैसी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरीगिव्हरी वास करुनु चाफळी श्री रघुनाथाची स्थापना करुनु सांप्रदाय सिष्य दिगंत विस्तिर्णता घडावी यैसी प्रार्थना केली. ते ही आसमंता गिरीगिव्हरी वास करुनि चाफली श्रींची स्थापना करुनु संप्रदाय सिष्य दिगंत विस्तीर्णता घडली. त्यास चाफली श्रीची पुजा मोहोत्सव, ब्राह्म‌णभोजन, अतिथी ईमारत सर्व यथासांग घडावे. जेथें जेथें श्रीच्या मूर्तीस्थापना जाली तेथे उत्साह पुजा घडावी, यांस राज्य संपादिले. यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावीं ते आज्ञा व्हावी. तेव्हा आज्ञा झाली की, विशेष उपाधीचे कारण काय ? तथापी तुमचे मनीं श्री रघुनाथाची सेवा घडावी हा निश्चय झाला. त्यास येथाअवकाश जेथे जे नेमावेसें वाटेल तें नेमावे व पुढे संप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तसे करीत जावें. याप्रकारे आज्ञा जाहली. यावरुनु देशांतरी सांप्रदाय व श्री रघुनाथाच्या स्थापना जाल्या, त्यास ग्रामभूमिची पत्रे करुन पाठविली. श्री संनिध चाफली येकसे येकवीस गाव सर्वमान्य व येकसे येकविस गावीं आकरा बिघे प्रमाणे भूमी व आकरा स्थळीं श्रीची स्थापना जाली. तेथे नैवेद्य पुजेस भूमी आकरा बिघे प्रमाणे नेमिले आहेती, यैसा संकल्प केला आहे, तो सिद्धीस नेण्याविसी विनंती केली, तेव्हा संकल्प केला तो परंपरेने सेवटास न्यावा ऐसी आज्ञा जाली. त्याजवरून सांप्रत गाऊ व भूमी नेमिले          त।।


(येथे ३३ गावे, ४१९ बिघे जमिन, एक कुरण व १२१ खंडी धान्य यांचा तपशील दिला आहे.)


येकूण दरोबस्त सर्वमान्य गाऊ तेहत्तीस व जमिन बिघे गाऊगना च्यारसे येकुणीस व कुरण येक श्रीचे पुजा उत्सवाबदल संकल्पातील सांप्रत नेमिले व उत्सहाचे दिवसास व ईमारतीस नख्ती यैवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. येणेकरून आक्षई उत्सहादी चालविण्याविसी आज्ञा असावी. राज्याभिषेक शके ५, काळयुक्ताक्षी नाम संवत्सरे, आश्विन शुद्ध दशमी, बहुत काय लिहीणे हे विज्ञापना !”


पुढील पत्रात यामूळ पत्राची नकल करून इनाम कमिशनकरीता इ.स. १८६१ मध्ये ही नकल इनाम कमिशनच्या अधिकृत पत्रव्यवहारात समाविष्ट केल्याचे लिहीले आहे. सदर पत्राच्या अनेक नकला असून त्यातील काही पुणे पुराभिलेखागार, सज्जनगड तसेच धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात आहेत.
चाफळ सनदेच्या नकलेची सुरुवात : मायना 


टीप : चाफळ सनदेच्या मूळ पत्राची छायांकित प्रत आता उपलब्ध झाली असून ती लवकरच येथे उपलब्ध करून देण्यात येईल.

- कौस्तुभ कस्तुरे