नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतरची अव्यवस्था

श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांना आणि त्यांची साथ देणार्‍यांना रान मोकळे मिळाले. नानासाहेब या सर्वांना प्रसंगी मायेत आणि प्रसंगी जरबेत राखून होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर माधवराव वयाने लहान असं समजून रघुनाथरावांचे मन फिरले. त्रिंबकरावमामा पेठे यांनी (बहुदा नाना पुरंदरेंना) लिहीलेल्या पत्रात ही परिस्थिती चटकन समजून येते. सदर पत्रावर तारिख नाही पण हे राक्षसभुवनच्या लढाईनंतर लगेच लिहील्याचे समजून येते. हे पत्र असे -सदर पत्रातील काही शब्दांचे / वाक्यांचे अर्थ असे-

१) कर्ते होते ते गेले = नानासाहेब आणि भाऊसाहेब.

२) घरात दहा वीसाचे सोने रुपे होते = दहा वीस लाखांची खासगी सोनं चांदी होती.
३) परचक्र आले = निजामाचा हल्ला
४) आठ दिवस जाऊन झाले = राक्षसभुवनच्या तहानंतर अथवा मोहीमेनंतर
५) राव थोर असते तरी.. = माधवराव
या पत्रात अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्र्यंबकराव पेठे म्हणतात-

१) "दादासाहेब सर्वांस वरिष्ठ.. त्यांची कर्तेपणाची स्थिती कळोन गेली" म्हणजे राघोबादादाची कर्तबगारी काय आहे ती गेल्या सात आठ महिन्यात दिसली (थोडक्यात काहीही नाही).

२) सव्वा-दीड करोड रुपयांचे कर्ज असता घरातील खासगी सोने रुपे मोडून माधवराव पेशव्यांनी कर्ज वारायचा प्रयत्न केला.


३) माधवराव लहान, त्यांची फारशी भीती कोणाला वाटत नाही. राघोबादादा 'मला गादी नको' म्हणतात, पण ते  स्वतःच्या मर्जीने बोलत नाहीत. एवढी संधी कोण सोडेल की काय ? सखारामबापूच्या शिकवणीने ते म्हणतात. सखारामबापूला स्वतःला दिवाणगिरी मिळत असता त्याने सुद्धा काहीतरी हेतू मनात ठेवून घेतली नाही. 

४) बाबुजी नाईक बारामतीकर वगैरे लोक म्हणतात की सखारामबापू कारभारी (दिवाण) असला तर आम्ही चाकरी नाही करणार. 


५) त्र्यंबकराव स्पष्ट म्हणतात की "राघोबादादाचा खर्च जवळपास वर्षाला ऐंशी लाखाचा आहे. नानासाहेब गेल्यावर पंधरा दिवसात आपण छानछोकी, छंद दूर करून राज्यात लक्ष घालीन असं राघोबादादानी म्हटलं खरं, पण आपण कशावर खर्च करतोय हे त्यांना समजत नाही. आयत्या पिठावर पोट भरून वर आणखी दहा वीस लाखाचे कर्ज करून येत". दादांंचा कारभारी या नात्याने बापू पाच-दहा लाख आणत तेव्हा त्यांना नानासाहेब कर्जाविषयी  विचारत, पण बापू म्हणे  "दादासाहेब करतील ते ! मी काय करणार". यापुढे त्र्यंबकराव या प्रकाराला उपरोधात्मक म्हणतात की "रखेली आवडती झाली म्हणून तीला घराच्यांची काळजी थोडीच असणार", म्हणजेच दादाचं बापूवाचून अडत नाही म्हणून बापूला दौलतीची थोडीच काळजी असणार. कोणी दादासाहेबांना समजावयास गेले की  सखाराम त्यांचे कान भरून त्यांना परावृत्त करी. 

६) त्र्यंबकराव ज्याला पत्र लिहीले त्याला (बहुदा नाना पुरंदरेंना) म्हणतात, की तुम्ही शांतपणे पाहता याचा अर्थ काय  ? राघोबादादा मोठा आहे म्हणून घाबरू नका. दादासाहेब कर्ते असते तरी चिंता नव्हती, पाण दौलत बुडत चालली आहे ! तुम्ही माधवरावांना आपल्यापाशी बोलवा (म्हणजे तुम्ही सल्लागार बना).


पत्राचा स्रोत : ऐतिहासिक लेखसंग्रह भाग १, अंक ३, लेखांक ५५© कौस्तुभ कस्तुरे