गणपतीचा उत्सव- लोकमान्यांचा केसरीतील अग्रलेख (इ.स.१८९४)

केसरी, दि. १८ सप्टेंबर १८९४

गणपतीचा उत्सव यंदाचा भाद्रपद महिना व विशेषतः गेली अनंतचतुर्दशी वगेरे दिवस मराठ्यांच्या इतिहासांत आणि मुख्यत्वेकरून पेशव्यांची राजधानी जे पुणं शहर त्यांच्या इतिहासांत सुवर्णांच्या अक्षरांनी नोंदण्यासारखे गाजले. नागपंचमीचा सण झाल्यादिवसापासून तों थेट गणपतिविसर्जनाच्या म्हणजे अनंतचतुर्दशीच्या दिवसापर्यंत सर्व पुणें शहर गणपतीच्या भजनानें गजबजून गेलें होते.
गणपति देवता आजपर्यंत पांढरपेशे वगेरे लोकांमध्ये असून त्या देवतेसंबंधाने घरोघरी उत्सव, मंत्रपुष्प, जाग्रणें, कीतंने वगरे थाटाने होत असत हें खरं आहे; तथापि यंदा आम्हां मराठ्यांचा आधारस्तंभ जो वैश्यवर्ग अगर प्रत्यही निढळाच्यर घामानें पेसे मिळवून आम्हां सर्वांची तोंडं उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादि औद्योगिक वर्ग यांतील लोकांन! यंदा विलक्षण रीतीचे सार्वजनिक स्फुरण येऊन त्यांनीं हा दिवस साजरा करण्यासाठी जी कांहीं मेहनत घेतली ती केवळ अपूर्व आहे. दिवसभर कामधंदा करून घरीं आल्यानंतर चकाट्या पिटीत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारांत लोळणारे व ह्या दारूच्या पायी बायकापोरांचे हाल करणांरे अथवा तमाशामध्ये अचकट विचकट गाणी ऐकत बसणारे या सर्वास निदान कांर्ही काळपर्यंत तरी उपरति होऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्रीगजवदनाच्या भजनपूजनांत गेला ही गोष्ट कांही लहान, सामान्य नाहीं. असो; गेल्या पंधरा दिवसपर्यंत पुण्याचे सर्व रस्ते रात्रौ मनुष्यांनीं फुलून गेलेले असत. प्रत्येक पेठेला किंबहुना प्रत्येक आळीला एक एक सार्वजनिक गणपती बसविलेला असून शक्‍त्यनुसार आरासही चांगली केलेली असे. ब्राह्मणांनी तर यथाशाक्ते वर्गणी दिलीच; परंतु विशेषतः लक्षांत ठेवण्याची गोष्ट ही आहे कीं, प्रत्येक सार्वजनिक गणपतीची *पट व भजनपूजनाचा थाट मराठे बंधूंकडून झाला आहे. कोतवाल चावडी, मार्केट, शाळुकराचा बोळ, रविवार, भाजीआळी, शुक्रवार, मेहुणपुरा, गणेश पेठ येथील गणपतीच्या मूर्ती खरोखरव प्रेक्षणीय होत्या. मेळ्यांता सरंजाम पाहता तर आमची मति गुंग झाली. श्रावण महिन्यांत जाता येतांना एखाददुसरं ***** येई; त्यावरून पुढे जो अभूतपूर्व चमत्कार दृष्टीस पडणार त्याची आम्हाला बरोबर कल्पना करता आली नाहीं हें आम्ही प्रांजळपणें कबूल करितो. मंडपातील प्रत्येक इसमाचा तो उज्वल पोषाख, ताल धरण्यासाठी हातांत धरलेली ती चित्रविचित्र काठी, एकाच ठेक्याने पडणारे सर्वांचे तें पाऊल, पद्ये म्हणणाऱ्याचा तो मनोहर आवाज, बाकीच्या लोकांचें भक्तिरसाने ओथंबलेले तें गाणें, सर्वत्र स्वधर्मांच्या स्तुतीने भरलेले ते कर्णमधुर आलाप, आमच्या मराठे बंधूंचा तो वीरश्रीपूर्वक उत्साह आणि त्यांचीं ती भव्य निश्याणें इत्यादि गोष्टी एके ठिकाणीं नव्हे, दोन ठिकाणी नव्हे, शंभर ठिकाणीं पाहण्याचा जेव्हां आम्हास अलम्यलाभ झाला तेव्हां "पाद्रिभटांच्या व नास्तिक सुधारकांच्या" निरर्गल प्रलापांनीं कांहीं लोकांचीं डोकीं भणाणून गेलीं आहेत तरी, आमच्या समाजाचें मुख्य स्थळ जे मराठेमंडळ त्यास कांहीं एक धक्का न पोहोचून आमचा स्वधर्मप्रेमा अजून जसाच्या तसा कायम आहे हें जेव्हां सर्वत्रांनी आपल्या चक्षूनीं पाहिलें, तेव्हां आम्हास फारच कौतुक वाटलें. आपल्या घरात एखादी चीर पडलेली पाहून पोटांत धस्स व्हावें, पण पायाचे दगड व ओसरीचे खांब शाबूद आहेत असें पाहून जसें स्वस्थ चित्त होतें तद्वतच आमच्या मनाची स्थिति झाली. असो; जसजसा अनंतचतुर्दशीचा दिवस जवळ जवळ येऊन ठेपला, तसतशी जिकडे तिकडे कडेकोट तयारी व्हावयास लागून, कोणाचा समारंभ चांगला वाढतो याबद्दल चढाओढी दिसू लागल्या, व कर्णमधुर गाणी ऐकू येऊं लागलीं, हा सर्व कारभार भाद्रपद शुद्ध त्रयोदशीपर्यंत नीट सुरळीतपणे चालला. गावांत अनेक तऱ्हेच्या भीतिदायक बातम्या पसरल्या होत्या; परंतु एकंदरीने हा समारंभ चांगल्या रीतीन शेवटास जाणार असं सर्वांस वाटूं लागलें होतें. इतक्यांत ह्या जगांतील सर्व मानवी खेळ अशाश्वत आहेत, असें दाखविण्याकरिताच जणोकाय कांहीं हिंदुधर्मद्वेष्ट्या लोकांनीं आपलें नाक कापून हिंदूस अपशकुन करावा यां बुद्धीनें आमच्या उत्सवांत विघ्न आणण्याचा बेत केला. परंतु आमच्यावर ईश्वरीकृपा मोठी आणि आम्हांस मि. ओम्यानीसारख्या निःपक्षपाती, दूरदर्शी आणि उदारमनस्क कलेक्टरसाहेबांचा उत्कृष्ट पाठिंबा मिळाल्यामुळे ह्या विघशतांतूनही आम्ही निभावलो व सर्व हिंदुजातींच्या पुरस्कर्त्याकडून गणेशविसर्जनाचा समारंभ सुखरूपपणे पार पडला. सुखरूपपणानें म्हणण्याचे कारण एवढेंच कीं, त्रयोदशीच्या रात्री झालेली धामधूम चतुर्दशीचे दिवर्शी बढई आळीचा गणपती फोडल्यामुळे झालेला विरस व उत्पन्न झालेली भीति ह्यांनी म्हणण्यासारवा अडथळा आला नाहीं. ह्या घामधुमीची हकीकत दुसरीकडे आलीच आहे, तेव्हां त्याची द्विरुक्ति येथे करीत नाहीं. असो; दोन वाजता पूर्वसंकेताप्रमाणें नेमलेल्या ठिकाणीं आळोआळीचे गणपति रेमार्केटाकडे येऊ लागले. आसपासच्या खेडेगांवचे गणपति येऊन दाखल झाले, त्या सगळ्याचे वर्णन कोण करू शकेल? जिकडे दृष्टि फेकावी तिकडे गणपतीचे विसर्जनाचे दृश्य आहे. चोंहींकडून “गणपति बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" हा कर्णध्वनी कर्णपटावर आदळून गगनमंडळ भेदून जात आहे, सर्वांच्या मस्तकी मंगलसूचक गुलाल शोभतो आहे. टिपऱ्यांचे, लेझीमींचे, घुंगरांचे, चौघड्यां व सनयांचे भिन्न भिन्न स्वरसंमेलनानें मनावर चमत्कारिक परिणाम उत्पन्न होत आहे. रेमार्केटापासून अप्पाबळवंताच्या गेटापर्यंत प्रेक्षकांचे थवेच्या थवे असल्यामुळें पाऊल ठेवावयासहि जागा मिळत नाहीं आहे. रस्त्यावरील माड्या, छपरे, कौलारे गजबजून सजीव झालेलीं दिसत आहेत. असा कादंबरीकारांस मात्र कल्पनागम्य देखावा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तेथे गेलेल्या प्रेक्षकगणास अनिर्वाच्य प्रेमानंद झाला व सर्व भक्तगणास धन्यता वाटली यांत काय आश्चर्य आहे? असो, मागे लिहिल्याप्रमाणे बरोबर दोन वाजतां गणपतीची स्वारी निघाली. अघाडीवर कसब्याचा गणपति व सर्वोच्च पिछाडीस श्री बाबासाहेब महाराज यांचा गणपति असे होते. वाटेने मंगलमूर्ती मोरयाचा ध्वनी, गुलालाचा धुमाकूळ आणि बत्ताशांचा वर्षाव असा समारंभ सुमारे सहा वाजण्याचे सुमारास लकडीपुलाजवळ पोहोचला. वाळवंटावर लेजीम, पटटा, भजन इत्यादि व्यवहार होऊन मग गणपतीचे विसर्जन झालें व मंडळी आलेल्या थाटानेंच परत फिरली. येणेप्रमाणे यंदाच्या समारंभ फारच प्रेक्षणीय झाला व पूर्वी पेशव्यांचे वेळेस जे गणपति निघत होते व हल्ली बडोदे, सांगली वगेरे ठिकाणीं जे द्रष्टव्य सभारंभ निघतात, त्यांच्या बरोबरीचा हा समारंभ झाला असे म्हणण्यास हरकत नाहीं. या समारंभाप्रीत्यथ ज्यांनीं पाण्यासारखे पेसे खर्च केले, ज्यांनी कवने केलीं, ज्यांनीं तीं प्रेमपुरस्सर म्हटली, ज्यांनीं ही अलौकिक स्वारी हल्लीच्या राशतींतही घडवून आणिली त्या मराठे व ब्राह्मण पुरस्कर्त्यांची सबंध नांवनिशी देण्यास आम्हीं असमर्थ आहों. सबब पुण्यवासी नागरिकांच्या तर्फेने व हिंदुधमाच्या तर्फेने आम्ही सर्वांविषयी सररहा आभार प्रदर्शित करितो आणि या संबंधाने एकदोन विचार सुचतात त्यांचें दिग्दर्शन करून हें गणपतीचे स्तवन पूर्ण करितों. 

यंदाची ही गणपतीची स्वारी ब्राह्मणांच्या प्रोत्साहनाने निघाली आहे, यांत धर्ममूलक उत्साहाचा एक थेंबहि नसून केवळ अन्य जातीयांवर ताण करण्यासाठी हे खूळ काढलें आहे, गणपतीची स्वारी ही ताबुतांची हुबेहुब नकल आहे, कांहीं तरी करमणूक करून घेण्यासाठी हें थोतांड काढलेले आहे असे नानाप्रकारचे तर्क युरोपियन वगेरे लोकांच्या डोक्यातून निघत आहेत हें नीटच आहे. या सर्वांचं यथास्थित परीक्षण करून त्यावर सुपूर्त अभिप्राय प्रकट करावयाचा म्हटलें म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथचं होईल, इतका काळ व स्थल आमचेजवळ नसल्यामुळे आम्हीं वरील आक्षेपांच्या खंडनाची दिशा मात्र दाखविणार आहो. ज्यांना “आजकाल नॅशनल कॉंग्रेसमध्ये, नेटिव्ह प्रेसमध्ये, संमतीवयाच्या कायद्याच्या आक्षेपकांमध्ये ब्राम्हण व बाबू दिसावयास लागले आहेत; अथवा कंसमामास भीती पडून ज्याप्रमाणे त्यांस सर्व जग कृष्णमय दिसू लागलें होते, तशी स्थिति होऊन वेड लागलें आहे, अश्या युरोपियन कामगारांसंबंधाने इतर आंग्लो-इंडियन लोकांसंबंधाने अगर मुसलमान लोकांसंबधानें आम्ही कांहीं लिहू इच्छित नाही. कारण उघडच आहे कीं, ज्यांचे मस्तक एकदां मत्सरानें, भीतीनें व क्रोधवशतेने शांतिशुन्य झालें त्यांच्यापुढे मोठ्या वशिष्ठाने वेदांत सांगितला तरी पालथ्या घागरीवर पाणी असाच प्रकार होणार आहे. पण ज्यास दोन आणि दोन चार इतके समजण्यापुरती अक्कल आहे, तो एकदम कबूल करील कीं, पुण्यातील गणपतीचा यंदाचा उत्सव फक्त ब्राह्मणांनी केला नसून त्याच्या आवाहनापासून तो विसर्जनापर्यंतच्या खटपटीत सर्व हिंदुलोकांचा हात आहे. व याबद्दल जितका अभिमान दत्तने साहजिक आहे, तितका सर्वांस वाटत आहे. शिवाय गणपतीचा उत्सव ही नवीनच टूम आहे असे म्हणणाऱ्यांनीं पेशवाईचा इतिहास वाचल्यास (खर्ड्याची बखर पहा) बडोदे, सांगली, जामखंडी इत्यादि ठिकाणी भाद्रपद महिन्यांत जाऊन आल्यास, व लहानथोर, श्रीमंत गरीब, इत्यादि लोक यथाशाक्त उत्सव करीत असतात तिकडे जरासं लक्ष पोंहोचाविल्यास आमच्या आक्षेपकांच्या लक्षांत ताबडतोब येईल कीं, हा उत्सव बराच जुना आणि सार्वजनिक आहे. यंदा फक्त नवीन गोष्ट झाली ती एवढीच आहे की, गणपतींची मिरवणूक मोठ्या थाटामाटाने झाली. मग यांत आनंद मानण्यासारखा परिणाम झाला असतां- म्हणजे साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राम्हण, व्यापारी, मारवाडी, चांभार देखील या सर्व जातींनी क्षणभर आपआपला जातिमत्सर सोडून देऊन परस्परांशी एका दिलाने व एका धर्माभिमानाने मिसळले व या सर्वांनी हातभार लावल्यामुळे सर्व समारंभ शेवटास गेला असतां - खेद करण्यासारखी ती काय गोष्ट झाली? आजपर्यंत आम्ही निरनिराळे ठिकाणीं भजनपूजन करीत होतों, ते एके ठिकाणीं करूं लागल्याबरोबर त्या भजनपूजनांतील धर्माचा अंश निःसत्व होऊन त्या जागीं कर्मणूक बया येऊन बसली काय? प्रत्येक मेळ्यांत अजमासें वीस पंचवीस मनुष्य असे व असे शंभर दीडशे मेळे होते, इतक्या सर्वानी म्हणजे तीन हजार माणसांनी रात्री पांच पांच तास मेहनत करून जीं गाणीं बसविलीं व हौसेचे पोषाख करून त्यासह तीं तालसुरांत म्हटली व हजारों स्त्रीपुरुषांनीं ती तेथे तेथे जाऊन ऐकली ह्या सर्वांना जर चैन, लहर, करमणूक असे नाव द्यावयाचें असेल तर भक्तिपंथ कोणता हेंच आम्हांस समजत नाही असे तरी म्हणावयास पाहिजे, किंवा ज्याला अधर्मवेडाच्या भुताने पछाडले त्यास भजनाचा ब्रह्मानंद कळत नाहीं असें तरी म्हटलें पाहिजे ! आतां गणपतीची स्वारी म्हणजे ताबुतांची नक्कल असे म्हणणारांनीं येथील भजनाचे आखाडे अगर पंढरीचे आषाढी कार्तिकीचे मेळे पाहिळे नाहींत असं म्हणणें भाग आहे. लेझिमी खेळणे, चौघडे वाजविणे इत्यादि बहुतेक गोष्टी प्रत्येक जत्रेत दृग्गोचर होतात, असं असतांना अमुक गोष्ट दुसऱ्यांची नकल आहे असें आग्रहपूर्वक म्हणणारांस काय म्हणावयाचे आहे? आतां आम्हांस जी गोष्ट कबूल करणें भाग आहे ती ही कीं, दोनतीनदे वर्षांपासून गेल्या दोनतीन वर्षांपर्यंत आम्हांपैकी कांही हिंदुधर्माचे असूनहि मुसलमानी. मोहरमसणाच्या वेळेस आपपरभाव सोडून देऊन त्यांच्या देवांस नवससायास करीत होते, सर्वाभूती ईश्वर आहे, जो आपल्या भक्तीस पावेल त्याचे भजन करावें असा आजपर्यंतचा आमचा सांप्रदाय होता. परंतु प्रतिवषी मुसलमानादी एकरूप होत असतांहि जेव्हां भलत्या लोकांच्या नादीं लागून पुष्कळ वर्षांचा स्नेहसंबंध विसरून विनाकारण प्राणहानी मारामारी करण्याची सुरुवात केली, आणि आमच्यांतील तडीतापसी यांस उगीच्याउगीच त्रास देण्याचा सपाटा चालविला. तेव्हां या कलहप्रिय मुसल्मानांचे देव अगर पीर पुजण्यानें सुद्धां मुसलमानांच्या हृदयास पाझर फुटत नाहींत व ते हिंदूची कत्तल करण्यास कमी करीत नाहीत असे दृष्टीस पडलें तेव्हां "डोल्यापुढे हिंदूंनी नाचावें किंवा कसे" हा प्रश्न पुढें येऊं लागला. १८९१ व १८९२ सालीं या प्रश्नाचा जोर दुणावला. प्रभासपट्टण, मुंबई, येवले वगेरे ठिकाणचें मुसलमानांचे वर्तन पाहून व नागपंचमीला व ज्ञानोबाच्या पालखीच्या वेळी जे अंतराय झाले, ह्या सर्वांवरून लोकांस उपरति होऊन त्यांनी आपल्या देवादिकांचे भजनपूजनाचा थाट पुनः पूर्वीप्रमाणे सुरू केला. यांत मुसलमानांस चीड येण्यासारखे त्यांनीं काय केलें हें कोणीं शांतपणानें समजुन घेऊन आम्हांस सांगेल काय? 

आतां आणखी एका गोष्टींचा उल्लेख करावयाचा. पुण्यास गडबड झाल्यापासून काही हिंदुधर्माची नालस्ती करणाऱ्या ब्राह्मणाविद्वेषी लोकांनीं मराठे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये फूट पडून सर्व हिंदूसमाजाचे अकल्याण करण्याच्या प्रयत्नास सुरुवात केली आहे. करितां आपण सर्वत्रांनी यावेळीं सावध असलें पाहिजे. आज दोन हजार वर्षेंपर्यंत ज्या मराठे ब्राह्मणांची सांगड सुटली नाही, जे मराठे आणि ब्राम्हण मुसलमानांच्या ऐन भरभराटीत म्हणजे १४ व्या व १५ व्या शतकांत एकमेकांच्या खांद्यांस मदत देऊन हिंदुलोकांची महती वाढण्यासाठी झटत होले, ओरंगजेबासारख्या कडकडीत इमामांच्या हातूनही जें जू फुटले नाहीं, ज्या उभयतांनी शेवटपर्यंत राज्यधुरेचा परित्याग केला नाहीं, जे युरोपिअन भटांच्या आपमतलबी वाग्जालाला भुलले नाहींत त्या मराठे व ब्राह्मणांमध्ये बिघाड पाडण्याचे काम अळणी लोकांकडून कसे सिद्धीस जातें म्हणा, पण नीच लोक आपल्या प्रयत्नास चुकत नाहींत एवढ खरे आहे. आतां हे लक्षांत ठेविलें पाहिजे की, हिंदुसमाजाच्या या दोन आधारस्तंभांनी उभयतांस हितकर होईल असें वर्तन ज्याप्रमाणे आजपर्यत ठेविले तसच पुढीह ठेविले पाहिजे, संकटसमयी एकमेकांस उपदेशाची, पैशाची, सलामसलतीची मदत करणें, एकमेकांस सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादि प्रेमसूचक गोष्टींनी आपले युग्म विशेष संलग्न होत जाणारें आहे. तेव्हां ज्या ज्या योगानें आपला निकटसंबंध निकटतर होत जाईल, त्या त्या गोष्टी करणे आणि करविणे हे आपलें आद्यकर्तव्य आहे. ब्राह्मणांनी आपलें वर्तन आहे तसेंच चोख ठेवून मराठ्यांस साह्य करण्याचा निश्चय केला, मराठ्यांनी शेतकीचा, कारखान्यांचा कारभार आपल्या हातांत घेऊन व्यसनहीन झाले, तर हल्ली असलेल्या परकीय छत्राखाली सुद्धां आपली भरभराटी होऊन आपल्या देशाची विमल कीर्ती सर्वत्र पसरेल आणि रसातळास गेळेला हिंदुस्थानदेश ज्या इंग्लिश छत्राखाली पुनः भरभराटीच्या शिखरास जाऊन पोहोचेल त्याचीहि कीर्ती दिगंतरीं पसरून इग्लंड व हिंदुस्थान या दोन देशांमध्ये अपूर्व प्रेमाचा संबंध उत्पन्न होऊन हे दोन्ही देश कालाचे अनंत तडाखे सोसण्यास तयार राहून प्रलयकालपर्यंत जगाचे पुढारीपण करतील. ही पर्वणी साधण्यास मुख्य गोष्ट म्हणजे ब्राम्हण आणि मराठे यांचा जो एकोपा आहे तो आहे तसाच राहिला पाहिजे, इतकेच नव्हे तर हल्लींच्या सज्ञान कालांत तो वृद्धिंगतही होत गेला पाहिजे. *** लोकांची निंदा करून ब्राम्हण व इतर हिंदू यांमध्ये फूट पाडण्याची खटपट ही काही पहिली नाहीं, अश्या खटपटी पूवी पुष्कळ वेळां झाल्या. परंतु ब्राम्हणांनी आपला शांतपणा व दूरदर्शींपणा कायम ठेवल्यामुळे त्या सर्व वाया गेल्या. त्या सर्व वाया घालविणे हें महत्तर काम जर श्रीमंगल्मूर्ति मोरयाच्या हातून होईल अशी आपल्यास आशा आहे तर त्या निर्विघ्नकारी परमेशाचे स्मरण करून ही आमची गणेशभक्ती कायम राहो असा आशीर्वाद मागतो व सर्वत्र ह्या देवतेच्या भजनपूजनाच्या उन्नतकारी सत्कृत्यांत आपला हातभार लावतील अशी त्यांस बुद्धि देण्याबद्दल ईश्वराची प्रार्थना करून व हिंदुलोकांस कलह नको आहेत, कलहाची मळसूत्रे अन्यजातीयांकडून फिरविली जात आहेत, अशी सरकारची खातरजमा होऊन हिंदुलोकांस न्यायाने, निःपक्षपातबुद्धीने, प्रजावात्सल्यानें वागविण्याची प्रेरणा दयाळु चक्रवर्तीनी महाराणी व्हिक्टोरिया यांच्या प्रतिनिधीमध्यें आकाशांतील बापाकडून अथवा आमच्या साकार, सगुण मूर्तीकडून होवो असे चिंतन करून हा बराच लांबलेला लेख पुरा करितो.


*************


टीप: सदर लेख हा दि. १८ सप्टेंबर १८९४ या दिवशी लोकमान्य टिळकांनी 'केसरी' मध्ये लिहिलेला 'गणेशोत्सवा'निमित्तचा अग्रलेख असून तत्कालीन समाजपद्धतीनुसार आणि वातावरणानुसार अनेक जाती-धर्मांचा उल्लेख झालेला आहे. या लेखात कोणतीही काटछाट न करता, माझी कोणतीही वैयक्तिक मते न देता येथे जसाच्या तसा दिला आहे. लोकमान्यांचा गणेशोत्सवामागचा विचार आणि एकंदर मनस्थिती दर्शवण्यासाठी हा लेख येथे देण्यात येत आहे. 


स्रोत: लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख, खंड १, पृ. ३३४