पानिपतचा प्रतिशोध.. दिल्लीवर भगवा !

दि. १० फेब्रुवारी १७७१ रोजी पानिपतनंतर अवघ्या दहा वर्षांत मराठ्यांनी दिल्ली पुन्हा "जिंकून" घेतली. पूर्वी सदाशिवरावभाऊ आले तेव्हा अल्पावधीकरिता दिल्लीचा किल्ला मराठ्यांकडे होता, पण आता केवळ तीन दिवसात मराठी तोफखान्यासमोर दिल्ली अक्षरशः लंगडी पडली. हिंदुस्थानच्या केंद्रसत्तेची राजधानी मराठी झंझावातासमोर दुबळी ठरली. कोणे एके काळी मोंगलांच्या प्रचंड फौजांना महिने-महिने लाभूनही पुरंदर-सिंहगड सारखे सह्याद्रीचे किल्ले मिळत नव्हते, पण त्याच मोंगलांची राजधानी तीन दिवसांत शरण आली. झाबेतखान पळून गेला.


मिरजेच्या पटवर्धनांच्या दफ्तरात या संबंधी एका पत्रात उल्लेख आहे की, "पत्रात हिंदुस्थानचे मात्र वर्तमान लिहिले आहे जे, इटाव्याचा किल्ला राजश्री रामचंद्र गणेश यांनी घेऊन दिल्लीस आले. सरकारचे झेंडे दिल्लीस उभे केले. पातशाह बसविणार. पन्नास लक्ष रुपये नजर बोलतात, हे पावणा करोड रुपये घेऊ म्हणतात. पावणा करोडीवर ठराव होईल तेव्हांच बसवीतील. सारांश, तिकडे फौजेचा नक्षा मोठा झाला म्हणून लिहिले आहे"[१]. ही दोन वाक्य जरी असली तरी यामागचा इतिहास प्रचंड आहे. सरकारचे झेंडे म्हणजे प्रत्यक्ष मराठ्यांचा भगवा जरीपटका दिल्लीच्या किल्यावर उभा केला. त्यातही, शाहआलम बादशहाला गादीवर बसवण्याकरता बादशहाकडून जी नजर मिळायची ती पन्नास लक्ष रुपये ते देणार होते, पण मराठी धुरीण मात्र पाऊण कोटी रुपयांवर असून बसले. साहजिक आहे, मोंगलांनी इतके वर्ष पिळलं होतं, आता त्यांना सहजासहजी सुख लाभणं शक्य नव्हतं. पाऊण करोड दिले नाहीत तर बादशाह बसवणार नाही असं रामचंद्रपंतांनी सांगितलं. मुघल बादशाह शाहआलम यावेळी अलाहाबादेस होता. दोन दिवसांतच बादशहाकडे मराठ्यांची मागणी पोहोचली. मराठे दिल्ली घेऊ शकतात आणि झाबेतखानाला हरवू शकतात त्यावरून त्यांच्याशिवाय कोणीही आपल्याला इतर शत्रूंपासून वाचवू शकत नाही, अथवा इतर कोणीही मराठ्यांच्या तावडीतून वाचवू शकत नाही हे बादशहाला समजलं. त्याने अखेरीस करारावर स्वाक्षऱ्या केल्या ज्यात अशी कलमे होती[२] -

१) लाल किल्ला बादशहाच्या हाती सोपवल्यानंतर आठ दिवसात दहा लाख रुपये मराठ्यांना देणे. 

२) खुद्द बादशाह दिल्लीत आल्यानंतर पंधरा लाख रुपये मराठ्यांना द्यायचे, आणि ते द्यायला असमर्थता दिसली तर मराठे ते आसपासच्या मुलुखातून 'वसूल' करू शकतात. 

३) पूर्वीच्या मोंगल-मराठा तहान्वये जे प्रदेश मराठ्यांकडे होते ते पूर्ववत चालवावेत. 

४) केवळ वजीर सोडल्यास मोंगल दरबारातील इतर नेमणूक करण्याचा हक्क मराठ्यांना मिळेल. 

एकूण काय, तर प्रत्यक्ष बादशाह मराठ्यांचा पुन्हा अंकित झाल्यागत होता. 

हे सगळं होण्यापूर्वी श्रीमंत माधवराव पेशवे पुण्यातून या सगळ्या हालचालींवर नजर ठेऊन होते. उत्तरेत मराठी फौज गेल्या तरी सरदारांमध्ये आपापसात बेबनाव होते, ते मोडून काढून सगळ्यांनी एक होऊन काम करावं अशा माधवरावांच्या आज्ञा होत्या. अखेरीस दि. २१ डिसेंबर १७७० रोजी माधवरावांनी या रामचंद्र गणेश कानडे आणि खुद्द पेशव्यांच्या हुजुरातीचे प्रमुख विसाजीपंत बिनीवाले यांना पत्रं लिहून पुढे कसं काय करा हे सांगितलं[३]. माधवराव म्हणतात, "नजीबखानाच्या मरणामुळे दिल्लीचा बंदोबस्त तुटला असेल, यास्तव तुम्ही रोहिल्यांची मामलत, पैक्यावर करावी. पेस्टार साली मुलुख सोपवून देतो ऐसे लिहून घेऊन मामला चुकवावी. दिल्लीचा बंदोबस्त झाबेतखानाने केला नाही, तो तुम्ही दिल्लीस जावे, दिल्ली हस्तगत करावी, आपला बंदोबस्त करावा. यंदाचं रोहिल्यापासून मुलुख सोडवावयाची अड न धारावी, दिल्ली काबिजात जाल्यास वजारताची आरजू सुज्याउद्दौल्यास आहे व पातशाह तख्तावर बसावे हे जरूर, तेव्हा ते तुमचे मुद्दे मान्य करतील, पैका देतील व मुलुख देतील. तुम्ही चार कलमे अधिक लिहून दिली तरी करीतील". हे सगळं पत्रं खूप विस्तृत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माझ्याकडे असलेल्या या पत्राच्या एका नकलेची लांबी नऊ फुटांची असून त्या पत्राच्या दोन्ही बाजूला मजकूर आहे. 

दि. १७ मार्च १७७१ रोजी रामशास्त्री प्रभुणे यांनी एका पत्रात म्हटलंय, "सांप्रतचे वर्तमान राजश्री विसाजीपंत दादा व महादजीबाबा शिंदे वगैरे सरदारांनी सनदा करून दिल्ली घेऊन बंदोबस्त केला. हे यश मोठे आले. श्रीमंतांचेही मानस ऐसेच होते म्हणून वारंवार पत्री आज्ञा जात होती, असे असता राजश्री रामचंद्रपंत तात्यास अनुकूल पडले. दादाच या यशाचे विभागी होते. मुख्य साहेबाकमावर निष्ठा तेथे सुदृढ यश"[४]

एकूणच, हा विजय खूप मोठा होता. मराठे दिल्लीवर पुन्हा कब्जा मिळवतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. दिल्लीचा बादशाह इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता, तो सुद्धा मराठ्यांची धास्ती पडून पुन्हा माघारी आला. इंग्रज किमान या वेळेस तरी केवळ चरफडण्यापलीकडे काही करू शकले नाहीत. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सैफुद्दीन महंमदाने बाद्शाहातर्फे किल्ला घेईपर्यंत- १२ ऑगस्टपर्यंत म्हणजे सहा महिन्यांपर्यंत भगवा जरीपटका डौलाने फडकत होता. हा मराठ्यांनी घेतलेला पानिपतचा प्रतिशोध होता. या संपूर्ण मोहिमेत जरी चार मुख्य सरदार असले तरी पुढे हुजुरातीचे सेनापती विसाजीपंत बिनीवाले आणि यानंतर उदय पावलेले पराक्रमी सेनापती महादजीबाबा शिंदे यांनी या मोहिमेवर वैभवाचा कळस चढवला. 


स्रोत:

१. ऐतिहासिक लेखसंग्रह लेखांक १११० : वा. वा. खरे
२. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ७, लेखांक ९ : मा. वि. गुजर
३. मराठी रियासत खंड ५, पृ. १५४ : गो. स. सरदेसाई
४. पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद खंड २९, लेखांक २६५ : गो. स. सरदेसाई

*************

पानिपतानंतरच्या या माधवरावांच्या 'उत्तरहिंद'च्या महत्वाकांक्षेवर आधारित मी लिहिलेली, कॉन्टिनेन्टल प्रकाशन प्रकाशित ऐतिहासिक कादंबरी "प्रतिशोध पानिपतचा" ऑनलाईन-ऑफलाईन सर्वत्र उपलब्ध आहे, ती वाचून आपला अभिप्राय नक्की कळवा. 
कॉन्टिनेन्टलकडून थेट मागविण्यासाठी लिंक: http://bit.ly/2ERV2jL 


- © कौस्तुभ कस्तुरे । suvarnapaane@gmail.com